Mon, Aug 19, 2019 05:35होमपेज › Pune › आ.जगताप-लांडे युतीमुळे लांडगेंपुढे आव्हान

आ.जगताप-लांडे युतीमुळे लांडगेंपुढे आव्हान

Published On: Jul 20 2018 1:12AM | Last Updated: Jul 19 2018 10:17PMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच  भाजप  शहराध्यक्ष  आमदार लक्ष्मण जगताप व राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांच्यातील मैत्रीची शहरात जोरदार चर्चा आहे. त्यामुळे भाजपचे सहयोगी अपक्ष आमदार महेश लांडगे यांची भविष्यात राजकीय कोंडी होण्याची शक्यता वाढली आहे. राष्ट्रवादीच्या वतीने नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत प्रधानमंत्री आवास योजनेचे काम कोणाच्या, कोणत्या नातेवाईकाला द्यायचे यावरून या कामाचे घोडे अडल्याचे सांगत विलास लांडे यांनी आ. लांडगे यांना टार्गेट करण्याचा जो प्रयत्न केला, त्यातून ही बाब पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.
जगताप व लांडे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. जगताप विधान परिषदेचे तर लांडे विधानसभेचे आमदार असताना लांडे चुकून विधान परिषदेच्या सभागृहात गेल्याचा किस्सा चांगलाच गाजला होता.

सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आ. जगताप व लांडे संभ्रमावस्थेत होते. पिंपळे सौदागर येथे संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी आपण कार्यकर्त्यांशी बोलून योग्य  निर्णय घेऊ असे सांगितले. त्याच दिवशी जगताप यांनी भाजपचा रस्ता धरला मात्र, लांडे राष्ट्रवादीतच राहिले. विधानसभेला अपक्ष महेश लांडगे यांच्याकडून त्यांना पराभूत व्हावे लागले.जगताप हे चिंचवडमधून भाजपतर्फे निवडून आले. शहराध्यक्षही झाले. पुढे विधानपरिषद निवडणुकीत जगताप यांनी विलास लांडे यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरवले ; पण लांडे यांनी तलवार म्यान केल्याने जगताप तोंडावर पडले. मात्र, त्यांनी लांडे यांच्याशी मैत्री कायम ठेवली.

विलास लांडे यांचा वाढदिवस राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत नुकताच साजरा झाला.  या कार्यक्रमास जगताप यांनी आवर्जुन उपस्थिती दर्शवली. लांडे यांनी आ. जगताप हे माझे तीन पिढ्यांचे नातेवाईक आहेत.  शहर विकासात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. 2004 मध्ये त्यांच्यामुळे मी आमदार झालो.  2014 च्या निवडणुकीमध्ये त्यांच्याबरोबर भाजपात गेलो असतो तर फुकट आमदार झालो असतो.  पण मला जाणवे घालावे लागले असते असा चिमटा घेत जगतापांशी आपले मैत्रीचे नाते कायम राहील असे सांगितले तर जगताप यांनी लांडे हे राजकारणातील माझे गुरू,  द्रोणाचार्य आहेत; मात्र त्यांनी आजपर्यंत माझा अंगठा मागितला नाही. 

लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहू नका, असे त्यांनी मला सांगितले होते; परंतु मी मोठा होतो आहे म्हणून ते असे म्हणत असावेत असे वाटले. मी उभा राहिलो, मला पराभवास सामोरे जावे लागले. या शब्दात त्यांनी लांडे यांच्यातील दूरदर्शी नेतृत्वाचे कौतुक केले. राष्ट्रवादीच्या वतीने नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत लांडे यांना आपण लोकसभा निवडणूक लढवणार की विधानसभा असा प्रश्न केला असता ‘तुम्ही सांगाल ती’असे उत्तर दिले. त्यांनी पत्ते ओपन केले नसल्याने अनेकांची राजकीय कोंडी होणार आहे. भाजपचे सहयोगी अपक्ष आ. लांडगे आणि भाजप शहराध्यक्ष आ. जगताप यांचे फारसे जमत नाही. त्यामुळे लांडगे यांच्यासाठी जगताप-लांडे युती डोकेदुखी ठरणार आहे हे मात्र निश्चित.