Thu, Jul 18, 2019 10:08होमपेज › Pune › जगन्नाथ शेट्टींना सशर्त जामीन 

जगन्नाथ शेट्टींना सशर्त जामीन 

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 26 2017 12:00AM

बुकमार्क करा

पुणे  :  देवेंद्र जैन

शहरातील प्रसिद्ध वैशाली, रूपाली व आम्रपाली हॉटेल खोट्या कागदपत्रांच्या आधारे हडप करण्याचा प्रयत्न करणार्‍या जगन्नाथ शेट्टी व शशेंद्र शेट्टी यांना न्यायालयाने काही अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. 

वैशाली, रूपाली व आम्रपाली हॉटेलचे चालक जगन्नाथ शेट्टी यांच्याविरोधात सदर हॉटेलचे मूळ मालक कै. श्रीधर बाबू शेट्टी यांच्या पत्नी कै. अप्पी शेट्टी यांनी सन 2014 व 2016 मध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कै. अप्पी शेटी यांच्या 3 मुली यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यानुसार दि. 13 एप्रिल 2017 रोजी जगन्नाथ शेट्टी व शशेंद्र शेट्टींच्या विरोधात 420, 406, 465, 466, 471, 474 आणि 506 (1)34 कलमाअंतर्गत डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल होऊन नऊ महिने लोटले तरीही पोलिसांनी कोणत्याही आरोपीला अटक केलेली नव्हती.

श्रीधर बाबू शेट्टी यांच्या व्यवसायात (मद्रास हेल्थ होम, वैशालीचे मूळ व मद्रास कॅफेरूपालीचे मूळ नाव) जगन्नाथ शेट्टी हे कामाला होते. श्रीधर शेट्टी यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या मुलीशी जगन्नाथ यांनी लग्न केले व कागदपत्रे बनवून अप्पी शेट्टीऐवजी स्वत: मालमत्ता ताब्यात घेतल्या.  

त्यासाठी जगन्नाथ शेट्टी यांनी स्वत:च्या वडिलाचे नाव होंणाय शेट्टी असे असताना बाबू शेट्टी लावले व श्रीधर शेट्टींचा भाऊ असल्याचे भासवून मिळकत हडप केली असे तक्रारीत म्हटले आहे. न्यायालयाने वेळोवेळी समुपदेशन व तडजोडीचे प्रयत्न केले. वादींच्या वतीने श्रीकांत शिवदे यांनी जगन्नाथ शेट्टींनी केलेल्या अनेक गैरबाबी उजेडात आणणारे पुरावे न्यायालयास सादर केले. जगन्नाथ शेट्टी यांनी कशाप्रकारे सरकारी कागदपत्रांमध्ये फेरबदल केले; तसेच त्यांच्या पॅनकार्ड व पारपत्रांवर असलेल्या नावांच्या नोंदी याबाबत माहिती न्यायालयाला दिली. 

जगन्नाथ शेट्टी व शशेंद्र शेट्टींच्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल असताना पोलिसांवर मोठा दबाव होता, त्यामुळे त्यांना अटक केली जात नसल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला आणि  डेक्कन पोलिस ठाण्यामध्ये तशा आशयाचा फौजदारी गुन्हा दाखल केला. या तिन्ही हॉटेलचे मूळ मालक श्रीधर बाबू शेट्टी यांच्या पत्नी कै. अप्पी शेट्टी यांनीही अनेक तक्रारी दाखल केल्या होत्या. अप्पी शेट्टी यांच्या निधनानंतर त्यांच्या तिन्ही मुलींनी याचा पाठपुरावा केला. 

सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, जगनाथ शेट्टी व शशेंद्र शेट्टी यांनी कागदपत्रे कुठे व कधी तयार केली, याचा तपास करायचा असून, त्यासाठी त्याला पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली. न्यायालयाने आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज काही अटी, शर्तींवर मंजूर केला. आरोपींची 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली. दोन्ही आरोपींनी आरोपपत्र सादर होईपर्यंत प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी व गुरुवारी सकाळी 9 ते 12 पर्यंत डेक्कन पोलिस ठाण्यात हजेरी लावायची आहे; तसेच दाखल गुन्ह्यातील कागदपत्रांमध्ये काहीही बदल करायचा नाही व साक्षीदार अथवा तक्रारदार यांच्याबरोबर कुठलीही गैरवर्तणूक करावयाची नाही, असे आपल्या आदेशात न्यायाधीश ए. के. पाटील यांनी म्हटले आहे.