Mon, Apr 22, 2019 23:40होमपेज › Pune › जगद‍्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवत मुक्कामी

जगद‍्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवत मुक्कामी

Published On: Jul 11 2018 1:38AM | Last Updated: Jul 11 2018 1:28AMयवत : दीपक देशमुख

पिटू भक्तीचा डांगोरा । 
कळीकाळासी दरारा ।
तुका म्हणे करा । 
जयजयकार आनंदे ॥3॥

संतशिरोमणी जगद‍्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळा मंगळवारी (दि. 10) सायंकाळी आठच्या सुमारास यवत मुक्कामी विसावला. गावामधील काळभैरवनाथ मंदिरात पालखी सोहळा आल्यानंतर समाजआरती होऊन  दिंड्यांची हजेरी घेण्यात आली. यवत ग्रामस्थांनी मोठ्या भक्तिभावाने पालखी सोहळ्याचे स्वागत केले. लोणी काळभोर येथील मुक्काम उरकून मंगळवारी सकाळी पालखी सोहळा यवतच्या दिशेने रवाना झाला. हवेली आणि दौंड तालुक्याच्या सीमेवर सायंकाळी 4 वाजता बोरीभडक या ठिकाणी पालखीचे स्वागत करण्यासाठी बोरीभडकचे सरपंच बाबूराव गजभिये,  खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहुल कुल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, पंचायत समिती उपसभापती सुशांत दरेकर, पंचायत समिती सदस्य नितीन दोरगे, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, आदी उपस्थित होते. 

पुणे-सोलापूर महामार्गावर भक्तीचा महापूर आल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. ऊन-सावलीचा खेळ अनुभवत पालखी सोहळा व वारकरी पंढरीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. वैष्णवजनांच्या स्वागतासाठी यवत ग्रामस्थांनी जोरदार तयारी केली होती. पालखीमार्गावर वारकर्‍यांच्या सेवेसाठी ठिकठिकाणी भोजन व चहा  वाटपाची व्यवस्था केली होती. यवत ग्रामस्थांनी पिठलं भाकरीचा बेत केला होता. तसेच घरोघरी वारकरी मंडळींसाठी भोजनाची व्यवस्था केली होती. तुकाराम महाराज व विठुरायाच्या भक्तांची सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून लडकतवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांनीही पालखी मार्गावर शुद्ध पाणी व केळी वाटप केले. हॉटेल शेरू या ठिकाणी बालाजी ग्रुपतर्फे चहावाटप, आमदार राहुल कुल मित्रमंडळातर्फे प्राथमिक औषधोपचार पेटी वाटप करण्यात आले.