Wed, Apr 24, 2019 19:42होमपेज › Pune › जगद‍्गुरूंचा पालखी सोहळा सराटी मुक्‍कामी

जगद‍्गुरूंचा पालखी सोहळा सराटी मुक्‍कामी

Published On: Jul 18 2018 1:54AM | Last Updated: Jul 18 2018 12:58AMबावडा : राजेंद्र कवडे-देशमुख

जगद‍्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने मंगळवारी (दि. 17) बावडा येथे दुपारचा मुक्‍काम केला. त्यानंतर बावडेकरांचा निरोप घेऊन सायंकाळी साडेसहा वाजता पालखी सोहळा हा पुणे जिल्ह्यातील शेवटच्या मुक्‍कामासाठी निरा नदीकाठी वसलेल्या सराटी (ता. इंदापूर) गावी विसावला. दरम्यान, बुधवारी सकाळी आठ वाजता पालखी सोहळा निरा नदी ओलांडून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. 

इंदापूर शहरातील मुक्‍काम संपवून सकाळी पालखी सोहळ्याने 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या बावड्याकडे दुपारच्या मुक्कामासाठी प्रस्थान केले. प्रवासात विठ्ठलवाडी, वडापुरी, रामवाडी, सुरवड व वकीलवस्ती ग्रामस्थांचे स्वागत स्वीकारत पालखी सोहळा दुपारी 3 वाजता दुपारच्या मुक्कामासाठी दाखल झाला. तत्पूर्वी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे इंदापूरहून विठ्ठलवाडीपर्यंत पायी चालत सोहळ्यात सहभागी झाले होते.

शेटफळ पाटी येथे राजवर्धन ग्रुपचे अध्यक्ष संजय शिंदे व सहकार्‍यांनी वारकर्‍यांसाठी नाश्ता व चहाची मोफत व्यवस्था केली होती. सुरवड येथे निरा भीमा कारखान्याचे संचालक दादासाहेब घोगरे, सुरेश मेहेर, सरपंच बाळासाहेब घोगरे, उपसरपंच अनिल दडस आदींनी स्वागत केले.त्यानंतर ह.भ.प. शेतकरी बाबांच्या समाधी मंदिर येथे पालखीची आरती झाली. तेथे वकीलवस्तीचे सरपंच नाना खंदारे यांनी स्पिकरची मोफत सेवा उपलब्ध करून दिली.सुरवड येथे काटी येथील कृष्णाई प्रतिष्ठानच्या वतीने सुनील लवटे व सहकार्‍यांनी वारकर्‍यांना अन्नदान केले.

बावडा गावच्या वेशीवर ग्रामस्थांनी फटाक्यांच्या आतषबाजीत पालखी सोहळ्याचे स्वागत केले. या वेळी इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील, अशोक घोगरे, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, विकास पाटील, नूतन सरपंच किरण पाटील, विश्वासराव पाटील, महादेव घाडगे, मनोज पाटील, अमरसिंह पाटील, धैर्यशील पाटील, उमेश घोगरे, अमोल घोगरे, शिवाजी सावंत, तुकाराम घोगरे, विद्यासागर घोगरे, दीपक शिंदे, नीलेश घोगरे, भीमराव आवारे आदींनी स्वागत केले. श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने माजी सचिव सुधीर पाटील, प्राचार्य सी. टी. कोकाटे यांनी स्वागत केले. त्यानंतर ग्रामस्थांनी परंपरेप्रमाणे पालखी खांद्यावर घेऊन बाजारतळावर उभारण्यात आलेल्या शामियानात आणली. या वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील; तसेच शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या विश्वस्त अंकिता पाटील यांनी पालखीला खांदा दिला. बावडा येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या रत्नाई निवासस्थानी हजारो वारकर्‍यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. तेथे जिल्हा परिषद सदस्या रत्नप्रभादेवी पाटील व जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचत गट असोसिएशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी वारकर्‍यांचे आदरातिथ्य केले.