होमपेज › Pune › जाधव भाजपचे दुसरे महापौर निश्‍चित!

जाधव भाजपचे दुसरे महापौर निश्‍चित!

Published On: Aug 01 2018 1:33AM | Last Updated: Jul 31 2018 11:43PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 25 व्या महापौरपदी भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक जाधववाडी, चिखलीचे भाजपचे नगरसेवक राहुल गुलाब जाधव याचे नाव निश्‍चित झाले आहे. तर, उपमहापौरपदी पवनानगर, चिंचवडचे भाजपचे नगरसेवक सचिन बाजीराव चिंचवडे यांचे नावही निश्‍चित झाल आहे. शनिवारी (दि.4) सकाळी अकराला होणार्‍या विशेष सर्वसाधारण सभेत या नावावर शिक्‍कामोर्तब होणार आहे.

महापौर व उपमहापौरपदासाठी नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी मंगळवारी (दि. 31) दुपारी 3 ते सायंकाळी 5 अशी वेळ होती. सत्ताधारी भाजपकडून दुपारी चारच्या सुमारास महापौरपदासाठी जाधव आणि उपमहापौर पदासाठी चिंचवडे याचे नाव अंतिम करण्यात आल्याचा संदेश पक्षश्रेष्ठीकडून मिळाला. त्यानंतर त्यांनी दुपारी साडेचारच्या सुमारास नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे अर्ज सादर केला. जाधव यांनी दोन अर्ज सादर केले. त्याच्या अर्जावर अनुक्रमे नगरसेविका स्वीनल म्हेत्रे व अश्‍विनी जाधव आणि माजी उपमहापौर शैलजा मोरे व सोनाली गव्हाणे यांनी सूचक व अनुमोदक म्हणून स्वाक्षर्‍या केल्या तर, चिंचवडे यांनीही दोन अर्ज भरले. त्यांच्या अर्जावर अनुक्रमे माधुरी कुलकर्णी व करूणा चिंचवडे आणि सुवर्णा बुर्डे भीमाताई फुगे यांनी सूचक व अनुमोदक म्हणून सही केली. 

या वेळी आ. महेश लांडगे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, विविध विषय समिती सभापती, नगरसेवक व पक्षाचे पदाधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. तसेच, समर्थकांनी पालिका भवनात दुपारी तीन वाजेपासूनच गर्दी केली होती. अर्ज भरल्यानंतर जाधव व चिंचवडे यांच्या नावाने घोषणा देत समर्थकांनी पालिका भवन डोक्यावर घेतले होते. अनेकांनी भावी महापौर व उपमहापौरांना शुभेच्छा देत त्यांच्यासोबत छायाचित्रे काढून घेतले.

राष्ट्रवादीच्या उमेदवारांनीही भरले अर्ज

राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेवक विनोद नढे यांनी महापौरपदासाठी आणि व नगरसेविका विनया तापकीर यांनी उपमहापौरपदासाठी प्रत्येकी दोन अर्ज सादर केले. नढे यांच्या अर्जावर अनुक्रमे जावेद शेख व प्रवीण भालेवर आणि दत्ता साने व श्याम लांडे यांनी सूचक व अनुमोदक म्हणून सही केली. तर, तापकीर यांच्या अर्जावर अनुक्रमे वैशाली घोडेकर व वैशाली काळभोर आणि प्रज्ञा खानोलकर व अनुराधा गोफणे यांनी स्वाक्षर्‍या केल्या. पूर्वीपासून महापौर व उपमहापौरपदासाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनेही अर्ज भरले आहेत. पुढील तीन दिवसांत पक्षश्रेष्ठींच्या सूचनेवरून अर्ज माघारी घ्यायचे किंवा नाही, याचा निर्णय घेतला जाईल. सध्या आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, असे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी सांगितले, दरम्यान, शिवसेनेची अचानक माघार घेत अर्ज दाखल केला नाही.