Fri, Apr 26, 2019 03:20होमपेज › Pune › वेगाची स्पर्धा ठरतेय जीवघेणी

वेगाची स्पर्धा ठरतेय जीवघेणी

Published On: Jul 19 2018 1:38AM | Last Updated: Jul 18 2018 10:49PMपुणे : नवनाथ शिंदे

अति रुंद आणि मोकळ्या मार्गावर वेगाशी स्पर्धा करीत वेगमर्यादा ओलांडल्यानेच पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वारंवार अपघात होत आहेत. 793 सीसी इंजिन म्हणजे कमी ताकद असलेली आणि सर्वाधिक 4 हजार सीसी क्षमतेचे इंजिन असलेली वाहनेही प्रतिताशी 120 ते 180 किलोमीटर वेगाने धावत असल्याने नियंत्रण सुटून अपघात होत असल्याचे अभ्यासकांचे निरीक्षण आहे. 

दळणवळणाचा वेग वाढण्यासाठी शासनाने पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाची उभारणी केली आहे. वास्तविक  प्रतिताशी 80 किलोमीटर वेग यानुसार या रस्त्याची शास्त्रीय दृष्टिकोनातून निर्मिती झाली आहे. पण, वाहनांच्या कमी-अधिक गतीमुळे ही मर्यादा पाळणे शक्य नाही. मात्र, गतीची स्पर्धाच सुरू असल्याने द्रुतगतीला अपघाताचे ग्रहण लागले आहे. चालकांचा बेशिस्तपणाही अपघातास कारणीभूत असून, लेनची शिस्त न पाळण्याबरोबरच वेगावर नियंत्रण नसणे, हे देखील कारण आहे.

द्रुतगतीची बांधणी लक्षात घेता या मार्गावर प्रति 80 किलोमीटरची मर्यादा ओलांडल्यास अपघात होण्याचा धोका आहे. मात्र, वेगाचे बंधन  कधीच मागे पडले आहे. त्यामुळे नवीन चालकही येथून 120च्या पुढेच वाहन दामटतो. अत्याधुनिक बनावटीच्या वाहनांमुळे ही गती सुरक्षित वाटते मात्र, घाटमार्ग आणि वेग याचा ताळमेळ चुकल्यास अपघात होऊ शकतो याचे भान सुटते. विशेष म्हणजे कमी क्षमतेची वाहनेही वेगाशी स्पर्धा करतात आणि नियंत्रण गमावून अपघात होतो, असे प्रकार वाढले आहेत. 

घाबरल्याने वाढते गती !

मुळात या मार्गावर भरधाव वेगाने धावणारी वाहने धडकू नयेत म्हणून 793 सीसी इतक्या कमी क्षमतेच्या वाहनांना 1 हजार 500 सीसी ते 4 हजार सीसी इतक्या जास्त क्षमतेच्या वाहनांइतका वेग ठेवावा लागतो. अनेकदा तेथेच गणित बिघडते आणि अपघात होतात. 

वाहतूक नियमांना 

बगल !रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संघटना, सामान्य जनतेच्या सहकार्याद्वारे हा प्रश्न हाताळण्याचे ठरविले होते. वाहतुकीच्या स्थितीनुरूप ग्रामीण आणि शहरी रस्त्यांच्या डिझाइनमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुरक्षा निकष लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र महामार्गावर असणार्‍या लेन स्पीडच्या नियमांना वाहनचालकांकडून फाटा दिला जात असल्यामुळे अपघातांची मालिका कायम आहे. राष्ट्रीय आणि राज्यांच्या महामार्गांवरील गस्त वाढविणे; तसेच अपघातग्रस्तांना तातडीच्या वैद्यकीय उपचाराचे लाभ मिळवून देण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. वेगावर नियंत्रण, धोकादायक ओव्हरटेकिंग टाळणे, सुरक्षा नियमांची नीट अंमलबजावणी ही त्रिसूत्री राबविल्यास  महामार्गावर अपघात टळण्यास मदत होईल. 

अपघाताची कारणे 

मानवी चुका 
अतिवेगाची नशा.
धोकादायक ओव्हरटेकिंग किंवा लेन कटिंग.
मद्यपान करून गाडी चालविणे.
गाडीत अनेक प्रवासी वाहतूक करणे, क्षमतेपेक्षा अधिक वजन वाहून नेणे.
गाडी चालविण्याचे नीट प्रशिक्षण न घेणे. 
चालकांवरील अतिताण, थकवा.
धुके किंवा मुसळधार पाऊस.
प्रचंड उष्णता निर्माण झाल्याने टायर फुटणे. 

हे करा... 

लेनची शिस्त नेहमी पाळा.
आखून दिलेली वेगमर्यादा पाळा. 
नेहमी सीट बेल्ट वापरा.
गाडी चालविताना नेहमी सतर्क राहा.
रात्रीच्या वेळी गाडी चालविताना  दिवे, पार्किंग लाइट सुरू आहेत का याची तपासणी करा.

हे करू नका...  

मद्यपान करून गाडी चालवू नका.
धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करू नका. 
कुठेही गाडी उभी करू नका.