Wed, May 22, 2019 22:53होमपेज › Pune › ‘कंत्राटी’च्या वेतनात अनियमितता

‘कंत्राटी’च्या वेतनात अनियमितता

Published On: Dec 19 2017 1:16AM | Last Updated: Dec 18 2017 11:52PM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रदीप लोखंडे

महावितरण कर्मचार्‍यांना दरमहिन्याच्या दहा तारखेच्या आत पगार देणे बंधनकारक आहे; मात्र या नियमाला ठेकेदार धाब्यावर बसवत आहेत. कर्मचार्‍यांचे चार महिने पगारच रखडले आहेत. महावितरणकडून बिल अदा केले जात असतानाही केवळ दोन महिन्यांचेच पगार दिले जात आहेत. त्यामुळे कर्मचार्‍यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.  

पिंपरी महावितरण कार्यालयांतर्गत सुमारे 52 कंत्राटी कर्मचारी कार्यरत होते. सध्या 48 कर्मचारी कार्यरत आहेत. कॉम्प्युटर ऑपरेटर, टेलिफोन ऑपरेटर, कनिष्ठ तंत्रज्ञ, ऑफिस बॉय आदींसह विविध पदांवर हे कर्मचारी कार्यरत आहेत.  कर्मचार्‍यांना ठेकेदाराकरवी कामावर नेमले जाते. ठेकेदाराकडून कामाची ऑर्डर स्वीकारली जाते, त्यानुसार काम केले जाते. ठेकेदारामार्फत सुमारे 9 हजार रुपये दर महिन्याला पगार दिला जात आहे. यामध्ये ‘पीएफ’ची रक्कम वगळता आठ तासांच्या कामासाठी 8 हजार 700 रुपये पगार मिळत आहेत. हे कर्मचारी पिंपरी महावितरण कार्यालयातंर्गत काम करतात.

तीन उपविभाग यामध्ये खराळवाडी, सांगवी, चिंचवड व 11 सेंटरचा समावेश होतो.  ठेकेदाराने केलेल्या कामाचे महावितरणकडून बिल अदा केले जाते. त्यानंतर ठेकेदार कर्मचार्‍यांच्या खात्यावर पगार जमा करतात. सध्या कर्मचार्‍यांना ऑगस्ट महिन्यापासून पगारच नव्हता. महावितरणकडून केलेल्या कामाचे बिलच मिळाले नसल्यामुळे हा पगार रखडला असल्याचे ठेकेदाराने सांगितले. पूर्वी रखडलेल्या जून व जुलै महिन्याचे पगार देण्यात आले आहेत; मात्र ऑगस्टपासून ऑक्टोबरपर्यंत तीन महिन्यांचा पगार रखडला होता. महावितरणकडून 17 लाख रुपये जमा झाल्याची माहिती कर्मचार्‍यांनी दिली, तरी देखील ऑगस्ट व सप्टेंबर असे केवळ दोन महिन्यांचेच पगार दिले आहेत. पगार जाणीवपूर्वक रखडला असल्याने संताप व्यक्त होत आहे. 

कामगार उपायुक्तांचेही दुर्लक्ष 

वारंवार पगार रखडला जात असल्यामुळे महावितरणच्या कर्मचार्‍यांनी कामगार उपायुक्तांकडे याबाबत तक्रार केली होती. दहा तारखेच्या आत पगार देण्याच्या सूचना करण्याची विनंती या वेळी कामगारांनी केली; मात्र कामगार उपायुक्तांनीही याकडे दुर्लक्ष केले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आम्ही दाद कोणाकडे मागायची, असा सवाल कामगार करत आहेत.