Tue, Apr 23, 2019 13:52होमपेज › Pune › विस्कटलेल्या आयुष्याला इस्त्रीची घडी!

विस्कटलेल्या आयुष्याला इस्त्रीची घडी!

Published On: May 17 2018 1:25AM | Last Updated: May 17 2018 12:12AMपुणे : अक्षय फाटक

पुण्यात एक नवं इस्त्रीचं दुकान सुरू झालंय... पत्र्याची रंगवलेली खोली अन्  फुलांनी सजवलेल्या तोरणानं तिथं तुमचं स्वागत होतं... तुमचे कपडेही अगदी स्वस्तात आणि मस्त कडक इस्त्री करून दिले जातात. हे दुकान नक्की कुठे आहे,  हा प्रश्‍न नक्कीच तुम्हाला पडला असेल... उत्तर ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्‍चर्याचा धक्का बसेल. हे दुकान सुरू झालंय येरवडा कारागृहात...! अन् इस्त्रीवाले आहेत शिक्षा भोगणारे कैदी...!

राज्यातील कारागृहांमध्ये एकूण 30 हजार कैदी आहेत. त्यांच्या हाताला काम देण्याची जबाबदारी कारागृह प्रशासनावर आहे. मात्र, प्रत्येक कैद्याला काम मिळवून देण्यासाठी कारागृह प्रशासनाला मर्यादा पडत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असून, त्या माध्यमातून कैद्यांना काम देण्यात येत आहे.  त्यातीलच एक उपक्रम सध्या सुरू करण्यात आला आहे, तो म्हणजे कपडे इस्त्री करण्याचा. 

येरवडा कारागृहात इस्त्री विभाग आहे. याठिकाणी कैद्यांना अधिकारी व  कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांचे कपडे इस्त्रीचेे काम करण्यास दिले जात होते. बाहेरच्या व्यक्तींचेही कपडे याठिकाणी येतात, मात्र ते शोरूममार्फत. त्यामुळे त्याला मर्यादा पडत असत. परंतु, याचा सर्वसामान्य व्यक्तींनाही फायदा व्हावा, अशी कारागृह प्रशासनाची संकल्पना होती. त्या संकल्पनेतून हे दुकान सुरू करण्यात आले आहे. 
त्यासोबतच, कैद्यांच्याही हाताला काम मिळावे आणि ते तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर एक कुशल कारागीर म्हणून त्यांना ओळख मिळावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. 

गेल्या महिन्यात (20 एप्रिल) कैद्यांच्या या इस्त्रीचे दुकान येरवडा जेल चौक गुंजन टॉकीज येथे कारागृह उद्योग विक्री केंद्रात सुरू झाले आहे. या दुकानात सध्या पाच कैदी काम करतात. न्यायालयाने वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा सुनावलेले हे कैदी आहेत. आता पाच कर्मचारीही या दुकानात कमी पडत आहेत. गेल्या वीस दिवसांमध्ये तब्बल 42 हजारांचा व्यवसाय या कैद्यांनी केला आहे. आता हा व्यवसाय वाढत आहे. त्यामुळे  कारागृहाकडून आणखी काही कैद्यांची संख्या वाढविण्याचा विचार आहे. 

या दुकानाचे  वैशिष्ट्य म्हणजे, याठिकाणी इतर इस्त्रीच्या दुकानांपेक्षा अत्यंत कमी दर आहेत. त्यातही येथील सुविधा चांगली तर आहेच, परंतु सेवाही तत्काळ आहे. त्याला सध्या प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. येथे काम करणारे कैदीही समाधानी आहेत. शहरातल्या उच्चभ्रू भागांसह येरवडा, चंदननगर, विमाननगर, कल्याणीनगर आणि आसपासच्या परिसरातून याठिकाणी इस्त्री करण्यासाठी लोक कपडे घेऊन येतात. त्यांना सकाळी कपडे दिले की, सायंकाळी परत इस्त्री करून मिळत आहेत. हे कैदी अधिकार्‍यांनी दाखविलेला विश्‍वास सार्थ ठरवत, उत्त्तम काम करत आहेत. कारागृह प्रशासनाकडून कैद्यांसाठी वेगवेगळे  उपक्रम राबविण्यात येत आहेत.

एक कपडा चार रुपये...

शहरातील इतर इस्त्रीच्या दुकानातील दरापेक्षा अत्यल्प दरात येथे कपडे इस्त्री केले जात आहेत. एका कपड्यासाठी 4 रुपये घेतले जातात. तर, जीएसटी म्हणून 72 पैसे घेतले जात आहेत. एका कैद्याला दिवसाला 55 रुपये मजुरी मिळते. तर, एखादा कुशल कैदी जास्तीचे काम करून एका दिवसात दुप्पट कमाई करत आहे. त्यानुसार, वीस दिवसांमध्ये 42 हजार 628 रुपयांचा व्यवसाय केला आहे.

शेतीत एका वर्षात 3 कोटी 86 हजार

कारागृह प्रशासनाने एका वर्षात (2017-18) शेतीत पालेभाजी, फळे तसेच अन्नधान्यातून (गहू, ज्वारी व इतर) तब्बल 3 कोटी 86 लाख रुपये उत्पन्न झाले आहे. त्यासाठी 2 कोटी 27 लाख खर्च झाला असून, 1 कोटी 59 रुपये निवळ नफा कारागृहाला मिळाला आहे. विशेष म्हणजे, वर्षभर 815 पुरुष कैदी व 35 महिला कैद्यांनी काम केले आहे. सर्वात जास्त शेती उत्पन्नात प्रथम क्रमांक पैठण कारागृह, विसापूर खुले कारागृहाचा दुसरा आणि नाशिकरोड खुले कारागृहाने तिसरा क्रमांक मिळवला आहे.