Tue, Jan 22, 2019 22:06



होमपेज › Pune › निमंत्रणपत्रिका, स्मृतिचिन्हास लगाम

निमंत्रणपत्रिका, स्मृतिचिन्हास लगाम

Published On: May 18 2018 1:32AM | Last Updated: May 18 2018 12:58AM



पिंपरी : प्रतिनिधी  

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध उद्घाटन, भूमिपूजन व कार्यक्रमांसाठी शेकडोच्या संख्येने निमत्रंणपत्रिका छापल्या जातात. त्या अनेकदा वेळेवर वितरीत न झाल्याने पडून राहतात. तसेच, विविध कार्यक्रमात स्मृतिचिन्ह वाटप केले जाते. हा खर्च या पुढे न करण्याचा ठराव स्थायी समितीने बुधवारी (दि.16) घेतला आहे. त्यामुळे पालिकेचे दरवर्षी लाखो रूपये बचत होणार आहे. समितीच्या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. सत्ताधारी भाजपने बचतीचे धोरण स्वीकारले आहे. त्या अंतर्गत अनेक खर्चाना फाटा देऊन आर्थिक बचत केली जात आहे. पालिकेच्या विविध कार्यक्रमासाठी निमंत्रणपत्रिका छापून घेतल्या जातात. त्या वेळेवर मिळत नसल्याने आणि ऐनवेळी मजकूर निश्‍चित झाल्याने त्या छापून मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे निमंत्रणपत्रिका वाटपाअभावी पडून राहतात. 

त्यामुळे त्याचा खर्च वाया जातो. या पुढे निमंत्रणपत्रिका न छापता केवळ संगणकावर साधी निमंत्रणपत्रिका तयार करून त्याच्या झेराक्स प्रती काढून वाटण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. तसेच, पालिकेच्या विविध कार्यक्रमामध्ये मान्यवरांचे सत्कार व गौरव करण्यासाठी स्मृतिचिन्ह प्रदान केले जातात. त्याची संख्या भरमसाट असल्याने त्यावर समितीने बंदी घातली आहे. केवळ केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि अतिविशिष्ट व्यक्तींसाठी स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात याव्यात, असा निर्णय समितीने घेतला आहे, अशी माहिती गायकवाड व समिती सदस्य विलास मडिगेरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.यापूर्वी समितीने पालिकेची दैनंदिनी (डायरी) न छापण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, सत्कारासाठी बुके, फुले, शाल व श्रीफळ न वापरता केवळ पुस्तक देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, विविध कार्यक्रम उघड्यावर मंडप घालून न घेता पालिकेच्या प्रेक्षागृहातच घेण्याची अट टाकली आहे. पालिकेचे उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमाचे स्वरूप छोटे केले आहे. त्यामुळे पालिकेच्या खर्चात बचत होत आहे.