होमपेज › Pune › पीक विमा योजनेतील घोटाळ्यांची चौकशी करा : राजु शेट्टी 

पीक विमा योजनेतील घोटाळ्यांची चौकशी करा : राजु शेट्टी 

Published On: May 27 2018 1:20AM | Last Updated: May 27 2018 1:11AMपुणे : प्रतिनिधी

देशात पीक विमा योजनेत मोठा घोटाळा असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजु शेट्टी यांनी केला असून, या बाबत राष्ट्रीय स्तरावर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आर्थिक वर्ष 2018-19 च्या खरीप हंगामाचे राज्याचे पीक विमा धोरण जाहिर झाले असून, परभणी, अमरावती, वर्धा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचे नांव नसल्याची माहिती स्वाभिमानीचे प्रवक्ते अ‍ॅड योगेश पांडे यांनी पत्रकान्वये कळविली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मराठवाडा अध्यक्ष माणिक कदम तसेच कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते राजन क्षीरसागर यांनी हैदराबाद येथे भारतीय विमा नियमक मंडळाकडे रिलायन्स कंपनी विरुद्ध तक्रार दिली होती. रिलायन्स जनरलद्वारे पीक विमा घेतलेल्या लाखो शेतकर्‍यांना पीक विमा नुकसान भरपाई रक्कम प्राप्त झालेली नसल्याचे तक्रारीत नमुद केले आहे.

याबाबत खासदार राजु शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रिलायन्स जनरलकडून खोटे विम्याचे कागदपत्र दाखविली जात असून, जमीन नसलेल्या शेतक र्‍यांच्या  नावाने पीक विमा घेतला गेला व चांगले पीक आले असे पंचनाम्यात नमुद करत, जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना पिक विमा मिळण्यापासून वंचित ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

देशात तब्बल 23 हजार कोटी रुपयांची रक्कम विमा हपत्यापोटी या कंपन्या जमा करतात. मात्र, केवळ सहा हजार कोटी रुपये इतकेच नुकसान भरपाईचे अर्ज मान्य केले गेले आहेत. रिलायन्स कंपनीकडून पीक विमा न मिळाल्याने नुकसानग्रस्त परभणी जिल्ह्यात तब्बल 107 शेतकर्‍यांनी एका वर्षात आत्महत्या केल्याने रिलायन्स विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असल्याचेही पांडे यांनी कळविले आहे.