Mon, Jun 17, 2019 18:18होमपेज › Pune › ठरावीक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये ‘नीट’ची सक्ती

ठरावीक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये ‘नीट’ची सक्ती

Published On: Mar 07 2018 1:55AM | Last Updated: Mar 07 2018 1:17AMपुणे : प्रतिनिधी 

आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याना नीट परीक्षा सक्तीची करण्याचा निर्णय आरोग्य मंत्रालयाने नुकताच घेतला आहे. आंतरराष्ट्रीय विद्यापीठात सध्या वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया कडून प्रमाणपत्र घेतले असेल तर मंत्रालय त्यांना सवलत देत आहे. परंतु अमेरिका, जर्मनीमध्ये जाणार्‍या विद्यार्थ्यांना मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया पात्रता प्रमाणपत्र देत नाही मात्र चीन, रशिया, युक्रेन येथे जाणार्‍या विद्यार्थ्यांना पात्रता प्रमाणपत्र देत आहे. त्यामुळे ठराविकच आंतरराष्ट्ीय विद्यापीठांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी नीट ची सक्ती का असा प्रश्‍न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.   

सक्तीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. तसेच अमेरिका, जर्मनीतील अभ्यासक्रमावर आधारित शिक्षण देणार्‍या देशात दर्जेदार वैद्यकीय शिक्षण मिळते व त्याला जागतिक पातळीवर मान्यता आहे, असा समज निर्माण केला जात आहे. त्यापाठीमागे  रशिया, चीन, युक्रेन, जॉर्जिया येथील शिक्षणाचा प्रसार करणे व अमेरिका, जर्मनी व फिलिपाईन्समधील प्रख्यात विद्यापीठांमध्ये शिकण्यास विद्यार्थ्यांना प्रतिबंध करणे, हाच यामागचा उद्देश आहे. 

सरकार अशा प्रकारे विशिष्ट देशांचा प्रसार करू शकते का,  असा प्रश्‍न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला  आहे.  आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये यापूर्वीच 1 ते 3 वर्षे शिकत असलेल्या विद्याथ्यांना नीट परीक्षा सक्तीची केल्यास त्यांच्यावर प्रचंड ताण निर्माण होईल, कारण त्यांना भारतात परत येऊन नीट परीक्षा द्यावी लागेल, जे आता अशक्य आहे.  परदेशात प्रथमच जाणार्‍या विद्यार्थ्यांना नीट परीक्षा सक्तीची करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, मात्र आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये बीएस अभ्यासक्रम करीत असलेल्या विद्यार्थ्यांना यातून सवलत मिळावी. अशी मागणी अ‍ॅस्ट्यूट करिअर कौन्सेलिंग अकॅडमीचे अध्यक्ष डॉ. तुषार देवरस यांनी केली आहे.