Thu, Jul 18, 2019 04:08होमपेज › Pune › ‘भाजप’त ‘दुरून डोंगर साजरे’

‘भाजप’त ‘दुरून डोंगर साजरे’

Published On: Jul 05 2018 1:40AM | Last Updated: Jul 05 2018 12:06AMपिंपरी : सिंजय शिंदे

पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपची सत्ता येऊन सव्वा वर्ष पूर्ण झाले. पक्षात सर्व आलबेल असल्याचे सध्या  वातावरण आहे; मात्र जुन्या बरोबरच नव्या लोकांत व पक्षात रंगत, खदखद वाढत चालली आहे. त्यामुळे  पक्षाची अवस्था ‘दुरून डोंगर साजरे’  असल्याची चर्चा खुद्द पक्षात आहे. याबाबत  शहरातील दोन आमदार, राज्यसभा खासदार आणि पालिकेतील पदाधिकार्‍यांनी वेळीच लक्ष दिले नाही तर येऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही हे कोणा ज्योतिषाला विचारण्याची गरज नाही.

पालिकेतील 15 वर्षाची राष्ट्रवादीची सत्ता उद्धवस्त करून शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप, भाजपाचे सहयोगी आ. महेश लांडगे, राज्यसभा खा. अमर साबळे, जेष्ट नेते आझम पानसरे यांच्या एकीच्या बाळामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळे पालिकेतील अजित पवारांची एक हाती सत्ता पिंपरी-चिंचवडकरणी उलथून टाकली. त्याअनुषंगाने शहरातील प्रमुख समस्यांपैकी अनधिकृत बांधकामे अधिकृत करणे, शास्ती कराबरोबर रेड झोनचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. त्यातील शास्ती काराबाबत शासनमध्ये निर्णय झाला असल्याचं भाजपने शहर स्तरावर पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते; मात्र शास्ती कर पूर्ण माफ झाला का नाही याबाबत अनिश्चितता असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरामध्ये भाजपबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

शहरात आघाडी सरकारच्या काळात  पक्ष टिकून ठेवण्यासाठी आणि पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी जुन्या-नव्यांचा संगम झाल्यामुळे ते यश पदरात पडले. जे नगरसेवक झाले ते पालिकेतील महत्वाच्या पदावर आपल्याला संधी मिळाली पाहिजे यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मात्र एकूण नगरसेवका पैकी काही जनांनाच संधी मिळणार असल्याने नाराजांची संख्या वाढतच चालली आहे. तर आम्ही शहरात पक्ष जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. किमान सत्ता आल्यावर तरी आमचा पक्षाने   विविध पदासाठी विचार करावा अशी अपेक्षा  करणार्‍याच्या पदरी निराशाच येताना दिसत आहे.

पालिकेतील पदाधिकारी बदलाच्या हालचाली सुरू आहेत. त्यातून शह-काटशह सुरू झाला असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे  संघटनात्मक कामाला गती मिळत नसल्याचे पहावयास मिळत आहे. ठराविक ठिकाणीच प्रयत्न सुरू असल्याचे पहावयास मिळत आहेत;  मात्र पक्षाचा अजेंडा पाहता ही गती वाढविण्याची नितांत गरज असल्याचे पक्षातच खसखस सुरू आहे.  त्यामुळे शहर स्तरावरील पदाधिकार्‍यांनी या खदखदीला वेळीच आवर घातला नाही तर पक्ष वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे.  आशिया खंडातील श्रीमंत महापालिकेत  सत्ता भाजपची असली तरी अंतर्गत वादामुळे पक्षा बरोबर नव्याने सामील होणारे जुन्याचे अनुभव पाहता भाजपा म्हणजे ‘दुरून डोंगर साजरे’ असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे अशा प्रतिक्रिया पक्षात उमटत आहेत.