Wed, Aug 21, 2019 01:55होमपेज › Pune › संस्कृती न विसरता भविष्यातील बदलांना तयार रहा 

संस्कृती न विसरता भविष्यातील बदलांना तयार रहा 

Published On: Feb 22 2018 1:24AM | Last Updated: Feb 21 2018 11:31PMपुणे : प्रतिनिधी

तरुण हीच आपल्या देशाची शक्‍ती आहे, याच जोरावर भारत हा जगात महासत्‍ता होणार आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याला भारतातील पहिली एक लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचा आराखडा सादर केला आहे. जगभरात विविध देशातील अवघ्या बारा प्रांतांना हे ध्येय गाठणे शक्य झाले असून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत ती क्षमता आहे. त्यामुळे भविष्यातील बदलांना तयार रहा, मात्र आपली संस्कृती विसरू नका,असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले.

विमाननगर येथील सिंबायोसिस लॉ स्कूलच्या  ’सिम्भव 2018’ या दहाव्या आंतर-महाविद्यालयीन वार्षिक सांकृतिक महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. सिम्बॉयसिस इंटरनॅशनल (अभिमत विद्यापीठ)चे कुलपती डॉ. शां. ब. मुजूमदार अध्यक्षस्थानी होते. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार जगदीश मुळीक, सिम्बॉयसिस इंटरनॅशनल (अभिमत विद्यापीठ)च्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, सिम्बॉयसिस लॉ स्कूलच्या संचालक डॉ. शशिकला गुर्पूर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, नव्या युगात अनेक विकसित देशांमध्ये मनुष्यबळाची चणचण भासत आहे. त्याउलट भारतात तरुणांची संख्या मोठी असून त्यामध्ये जगाच्या अर्थव्यवस्थेस हातभार लावण्याची क्षमता आहे. या शक्तीचे कार्यक्षम मनुष्यबळात रुपांतर करून नवनिर्मिती केल्यास भारतीय अर्थव्यवस्था गरुडभरारी घेऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, शिक्षण हे देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. भारतात बुद्धिमत्ता मुबलक प्रमाणात असून तिचा योग्य वापर होणे गरजेचे आहे.  ‘सिम्भव 18’ चे आयोजक कार्तिकेय चौहान यांनी सिंम्भवची संकल्पना स्पष्ट करून आयोजनाचा हेतू विशद केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लॉ स्कूलच्या संचालक डॉ. शशिकला गुर्पूर यांनी केले. आभार सिम्बॉयसिस इंटरनॅशनलचे (अभिमत विद्यापीठ) कुलगुरू डॉ. रजनी गुप्‍ते यांनी मानले.

महामित्र जनतेला जोडणारा प्लॅटफॉर्म...

कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी प्रशांत गुप्ता या विद्यार्थ्याने महामित्रच्या उपयुक्ततेबाबत प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्री म्हणाले, महामित्र हा डिजीटल प्लॅटफॉर्म लोकांना एकत्र आणण्यासाठी तयार करण्यात आला आहे. आपण लोकशाही मानणारे आहोत त्यामुळे राज्याच्या विकास प्रक्रीयेत नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. यासाठी महामित्र हा उपक्रम उपयुक्त असून या निमित्ताने राज्यातील जनतेला बरोबर घेतले जाणार आहे. या शिवाय पुणे मेट्रो, बसची कनेक्टीविटी, मुंबईतील मेट्रो,मोनोरेल, जलवाहतुक आदी प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले असता मुख्यमंत्र्यांनी समर्पक अशी उत्तरे दिली.

चांगले अधिकारी केवळ पुण्यालाच हवेत का?

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची नुकतीच नाशिकच्या महापालिका आयुक्तपदी बदली झाली. पीएमपीच्या सुधारणेसाठी मुंढे वेगाने पावले टाकत असतानाच तीन वर्षांचा कार्यकाळ होण्यापूर्वीच ही बदली झाल्याने पुणेकरांमध्ये नाराजी आहे. त्यासंदर्भात प्रामाणिक, कार्यक्षम अधिकार्‍यांना सदैव पाठिंबा देणारे मुख्यमंत्री म्हणून आपली ओळख आहे. मात्र, मुंढे यांची बदली पुणेकरांना अनपेक्षित होती, असा प्रश्न सिम्बायोसिसच्या एका प्राध्यापकाने मुख्यमंत्र्यांना विचारला. त्यावर केवळ पुण्यालाच चांगल्या अधिकार्‍यांची गरज नसून इतर शहरांनाही चांगले अधिकारी मिळाले पाहिजेत. मुंढे हे आता नाशिकचे आयुक्त झाले आहे असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले.