Wed, Jul 17, 2019 10:38होमपेज › Pune › जात निर्मूलनासाठी आंतरजातीय विवाह महत्त्वाचे

जात निर्मूलनासाठी आंतरजातीय विवाह महत्त्वाचे

Published On: Aug 05 2018 1:32AM | Last Updated: Aug 05 2018 12:14AMपुणे : प्रतिनिधी 

घटनेने दिलेले स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव ही त्रिसूत्री पुढे नेण्यासाठी आणि देशाच्या आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक उन्नतीसाठी आंतरजातीय विवाह महत्त्वाचे आहेत. त्यामुळे समाजातून जातीचे निर्मूलन होण्यास मदत होईल व मानवता निर्माण होईल, असे मत आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यांनी मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्त केले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या वतीने ‘जातिभेदमुक्त विकसित भारत अभियानांतर्गत’ ‘आधी केले मग सांगितले’ हा आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचा सत्कार व मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मिलिंद कांबळे व सीमा, डॉ. राजेंद्र हिरेमठ व लता, ज्योतीराव कुमार आहेर व तेजल आणि रंगभूषाकार करण थत्ते व स्वराली यांच्या डॉ. जयंत कुलकर्णी यांनी मुलाखती घेतल्या. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुनील भंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

समाज व्यवस्थेला जातीय आवरण आहे, लग्न करताना जातीचा अडसर न आणता खर्‍या प्रेमाचा विचार व्हावा, एकमेकांची साथ व विश्‍वास महत्त्वाचा, मुलींना तडजोडी स्वीकाराव्या लागतात, समजावून घ्यायला बराच काळ जावा लागतो, तेव्हा संसार सुरू होतो, पालकांचा विरोध कशासाठी हे समजावून घेणे महत्त्वाचे असते, स्वभाव, प्रतिष्ठा व अहंकारातून झालेला विचार तारतम्य दाखवला तर कमी करता येतो आणि घाई न करता परिस्थिती समजावून घेतली पाहिजे.

या सर्व गोष्टी चांगल्या पध्दतीने स्वीकारून आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिल्यास जागतिकीकरणात जातीला थारा नाही, असेही विचार या मुलाखतीतून व्यक्त करण्यात आले. डॉ. सुनील भंडगे यांनी प्रास्ताविक भाषण केले, डॉ. प्रशांत साठे यांनी सूत्रसंचालन केले, डॉ. ज्ञानेश्‍वर कुंभार यांनी आभार मानले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 98व्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.