Tue, Jul 16, 2019 21:51होमपेज › Pune › अपुरे मनुष्यबळ नव्या पोलिस आयुक्तालयाची समस्या

अपुरे मनुष्यबळ नव्या पोलिस आयुक्तालयाची समस्या

Published On: Aug 14 2018 1:35AM | Last Updated: Aug 14 2018 1:08AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाची व्याप्ती पाहता मिळणारे मनुष्यबळ अपुरे असल्याची खंत पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी सोमवारी (दि.13) व्यक्त केली. आज दिवसभर शहराचा दौरा केल्यानंतर सायंकाळी चिंचवडच्या ‘अ‍ॅटो क्लस्टर’ येथे पत्रकारांशी संवाद साधत असताना ते बोलत होते.

येत्या पंधरा ऑगस्टला ‘अ‍ॅटो क्लस्टर’ येथे ध्वजारोहण तसेच ठाणे दैनंदिनीला (स्टेशन डायरी) नोंद घेऊन आयुक्तालय कार्यान्वित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी आयुक्तालयातील पोलिस निरीक्षकांची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत निरीक्षकांनी आयुक्तांना स्वतःचा परिचय करून दिला. त्यानंतर आयुक्तांनी उपस्थित पत्रकारांशी वर्तालाप केला. या वेळी ते म्हणाले की, मी सध्या आयुक्तालयाअंतर्गत येणार्‍या परिसराची पाहणी करीत आहे. आतापर्यंतच्या माझ्या निरीक्षणानुसार पुणे आयुक्तालयाच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाची व्याप्ती मोठी आहे. त्या तुलनेत मिळणारे मनुष्यबळ अतिशय अल्प आहे. तरी या अपुर्‍या मनुष्यबळावर आयुक्तालय सुरू करण्यात येणार आहे. 

मात्र, येत्या काळात मनुष्यबळासाठी पाठपुरावा करावा लागेल. सन 2011 च्या  जनगणनेच्या आधारावर पोलिसांच्या संख्याबळाचा विचार केला जात आहे. हिंजवडी आयटी हब आणि एमआयडीसीमुळे शहरात दररोज लाखोंच्या संख्येने नागरिक शहरात येतात. त्यांची कुठेही नोंद नाही. या नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी देखील पिंपरी-चिंचवड पोलिसांवर राहणार आहे याचादेखील विचार करावा लागणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस  नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक 100 असाच राहणार असल्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मकरंद रानडे यांनी सांगितले. ते म्हणाले, काही तांत्रिक बाबींची पूर्तता होईपर्यंत नियंत्रण कक्षाचे कॉल पुण्यातून पिंपरीच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त होतील. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही. नागरिकांना पोलिस मदत वेळेत मिळेल.

गुरुवारी पोलिस महासंचालकांची बैठक 

आयुक्तालयाच्या एकंदरीत कामाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे पोलिस महासंचालक दत्तात्रय पडसळगीकर गुरुवारी (दि. 16) शहरात येणार आहेत. या वेळी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त आर.के. पद्मनाभन, पुणे पोलिस आयुक्त के. वेंकटशम आणि पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील उपस्थित राहणार आहेत.

दोन्ही झोन महिलांकडे

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकरिता तीन पोलिस उपायुक्त नियुक्‍त केले आहेत. सहायक आयुक्‍त पिंपरी आणि चाकण यांचा मिळून झोन एक तयार करण्यात आला आहे. या झोनकरिता स्मार्तना पाटील यांची पोलिस उपायुक्‍त म्हणून नियुक्‍ती केली आहे. तर सहायक आयुक्‍त वाकड आणि देहूरोड यांचा मिळून झोन क्रमांक दोन तयार करण्यात आला आहे. या झोनचा कारभार उपायुक्‍त नम्रता पाटील या पाहणार आहेत. मुख्यालयाचे उपायुक्‍त म्हणून विनायक ढाकणे हे काम पाहणार आहेत.