Sat, Apr 20, 2019 23:53होमपेज › Pune › नियोजित स्टेशनची अधिकार्‍यांकडून पाहणी

नियोजित स्टेशनची अधिकार्‍यांकडून पाहणी

Published On: Aug 01 2018 1:33AM | Last Updated: Aug 01 2018 12:05AMपुणे : प्रतिनिधी 

कसबा पेठेतील नियोजित मेट्रो स्टेशनबाबत स्थानिकांमध्ये नाराजी असल्याचे वृत्त ‘दैनिक पुढारी’ने मंगळवारी (31 जुलै)ला प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन महाराष्ट्र मेट्रो रेल कॅार्पोरेशन लिमिटेड कंपनीचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी कसबा पेठेतील नियोजित मेट्रो स्टेशनच्या जागेची पाहणी केली. या भेटीवेळी महापौर मुक्ता टिळक, महामेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रम्हण्यम, भुयारी मार्ग प्रकल्पाचे प्रमुख प्रमोद आहुजा आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

कसबा पेठेतील झांबरे चावडी रस्त्यावरील स्थानिकांची घरे मेट्रो स्टेशनमुळे बाधित होत आहेत. जे स्थानिक मेट्रो मार्गामुळे बाधित आहेत त्यांची गैरसोय होणार नाही, अशी ग्वाही महापौरांनी या भेटीवेळी दिली असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रम्हण्यम यांनी स्थानिकांना कार्यालयात येऊन चर्चा करण्याचे आवाहन केले आहे.  पुढील आठवड्यात स्थानिक नागरिक महापालिका, महामेट्रोला त्यांच्या मागण्यांचे निवेदन देणार आहेत.   झांबरे चावडी परिसरात मेट्रो स्टेशन भुयारी असणार आहे. त्यासाठी टनेलिंग मशिनचा वापर होईल. मात्र, झांबरे चावडी परिसरात हे मशिन बाहेर न काढता अन्य ठिकाणी काढल्यास आमची जागा बाधित होणार नाही. त्यामुळे आमचा याला विरोधही असणार नाही, असे स्थानिकांनी भुयारी मार्ग प्रकल्प प्रमुख प्रमोद आहुजा यांना सांगितले..