Fri, Jul 19, 2019 00:52होमपेज › Pune › पिंपरी-चिंचवडवर अन्याय

पिंपरी-चिंचवडवर अन्याय

Published On: Mar 09 2018 1:58AM | Last Updated: Mar 09 2018 1:58AMपिंपरी : मिलिंद कांबळे 

‘पुणे मेट्रो’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या 31.25 किलोमीटर अंतरापैकी पिंपरी-चिंचवड शहरातून मेट्रो केवळ 7. 25 किलोमीटर अंतर इतकीच धावणार आहे. यापाठोपाठ हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गात, तर मेट्रो केवळ शहरातील केवळ एका चौकातून वळसा घेणार आहे. या प्रकल्पात उद्योगनगरीचा केवळ नावापुरताच समावेश झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड शहराबाबत पुण्याच्या ‘कारभार्‍यां’नी भेदभावाची परंपरा कायम ठेवत एकप्रकारे अन्यायच केल्याचे चित्र आहे.

महामेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासाठी एकत्रितपणे पुणे मेट्रो प्रकल्प राबविला जात आहे. मेट्रोच्या नावामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश नसल्याचे येथील स्थानिकांची खंत कायम आहे. मेट्रोचे काम शहरासह पुण्यात ठिकठिकाणी वेगात सुरू आहे. पिंपरी ते स्वारगेट या 16.589 आणि वनाज ते रामवाडी या 14.665 किलोमीटर अंतरापैकी केवळ सव्वासात किलोमीटरवरच मेट्रो शहरातून धावणार आहे. स्वारगेट ते निगडी मेट्रो पहिल्या टप्प्याच करण्याची आग्रही मागणी असतानाही त्याकडे दुर्लक्ष करीत, पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर पिंपरीपर्यंत अर्ध्यापर्यंत मेट्रोचे काम केले जात आहे. संपूर्ण शहरात केवळ या ठिकाणी तेही अर्धवट मार्गावर मेट्रो होणार असल्याने नागरिकांची 
नाराजी आहे. 

त्यातच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी-शिवाजीनगर या 23.3 किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्गामध्येही पिंपरी-चिंचवड शहरावर पुन्हा अन्याय केला गेला आहे. ही मेट्रो हिंजवडी या ग्रामपंचायत हद्दीतून निघून, वाकड चौकातील उड्डाणपुलापासून मुंबई-बंगलोर महामार्गाने म्हाळुंगे-बालेवाडी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलासमोरून बाणेरमार्गे सकाळनगर, पुणे विद्यापीठ, शिवाजीनगर अशी जाणार आहे. या मार्गात केवळ उड्डाणपूल ते मधुबन हॉटेल हा केवळ 300 मीटरचा मार्ग  पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील आहे.

हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ही मेट्रो धावणार असे सांगितले जात आहे. मात्र, हिंजवडीतील सर्वाधिक अभियंते वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, सांगवी, औंध रस्ता, पिंपळे गुरव या पट्ट्यात वास्तव्यात आहेत. वाकड, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, सांगवी, औंध रस्ता, पुणे विद्यापीठ या मार्गाने मेट्रो मार्ग केला असता, तर या परिसरातील आयटी अभियंत्यांसह कामगार, व्यावसायिक व विद्यार्थ्यांना अधिकाधिक वापरता आला असता. पर्यायाने मेट्रोच्या प्रवाशांची संख्याही वाढली असती. घराजवळून मेट्रो धावत असल्याने आयटी अभियंत्यांनी आपली वाहने घरीच ठेवून मेट्रोने सुरक्षिपणे ये-जा करण्यास प्राधान्य दिले असते. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटण्यास अधिक मदत झाली असती. मात्र, येथील नागरिक व आयटी अभियंत्यांना त्याचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला आहे. दरम्यान, या संदर्भात पीएमआरडीचे अध्यक्ष किरण गित्ते यांच्याशी संपर्क साधला असता, ते मुंबईत असल्याने त्यांच्याशी बोलणे होऊ  शकले नाही.