Mon, May 20, 2019 22:42होमपेज › Pune › नि:शुल्क उपचारासाठी राज्यात केंद्रे उभारण्याचा प्रयत्न

गरिबांच्या डायलिसिससाठी ‘धर्मादाय’चा पुढाकार

Published On: Jun 03 2018 1:18AM | Last Updated: Jun 03 2018 12:39AMपुणे : प्रतिनिधी

मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त असलेल्या गरीब रुग्णांना दिलासा मिळावा म्हणून धर्मादाय आयुक्‍त कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. अशा रुग्णांना नि:शुल्क किंवा नाममात्र दरात डायलिसिस उपचार मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

डायलिसिसची सुविधा प्रामुख्याने मोठ्या शहरांमध्येच आहे. त्यात ती खर्चिक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना शहरांत येऊन असे उपचार घेणे आवाक्याबाहेरचे असल्याने त्यांना जिल्हा किंवा तालुकास्तरावर डायलिसिस केंद्रे उभारून ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धर्मादाय आयुक्‍त शिवकुमार डिगे यांनी राज्याच्या धर्मादाय विभागातील सर्व अधिकार्‍यांना पत्रे पाठवली आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या हजारो मुला-मुलींचे विवाह सर्वधर्मीय सामुदायिक सोहळ्यामध्ये लावून देण्याचा उपक्रम यशस्वी केल्यानंतर त्यांनी गरिबांच्या आरोग्यासाठी पाऊल उचलले आहे.

‘विश्‍वस्त संस्थांनी गरीब रुग्णांना मदत करणे विश्‍वस्त कायद्यानुसार अभिप्रेत आहे. राज्यात राबवण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यांतर्गत प्रत्येक जिल्हास्तरावर समित्यांची स्थापना केली आहे. 

जिल्हा स्तरावरील धर्मादाय रुग्णालये, तसेच खासगी रुग्णालयांच्या सहकार्याने जिल्हा किंवा तालुका स्तरावर डायलिसिस केंद्रे स्थापन करण्यासाठी या समित्यांनी प्रोत्साहन द्यावे. त्यासाठी त्या-त्या भागातील धार्मिक़ स्थळांकडून, तसचे सामाजिक संस्था आणि शैक्षणिक संस्थांकडूनही निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे धर्मादाय आयुक्‍तांनी जारी केलेल्या परिपत्रकामध्ये म्हटले आहे.