Tue, Apr 23, 2019 18:12होमपेज › Pune › पुण्याची माहिती झळकतेय रस्त्यावर

पुण्याची माहिती झळकतेय रस्त्यावर

Published On: Jan 19 2018 1:55AM | Last Updated: Jan 18 2018 11:59PMयेरवडा : वार्ताहर

नव्यानेच वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला येरवड्यातील कॉमरझोन आयटी पार्क ते  सावंत पेट्रोल पंपासमोरील रस्त्याला सध्या नवा लूक प्राप्त झाला आहे. पुणे शहराची ऐतिहासिक ओळख पटवून देणारी चित्रे रस्त्याच्या दुतर्फा असणार्‍या भिंतीवर रेखाटल्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणार्‍यांना एक वेगळाच अनुभव येताना दिसत आहे. चित्राद्वारे भिंती प्रत्येकाशी बोलू लागल्याने खरंच पुणे शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल होत असल्याचे जाणवू लागले आहे. 

येरवडा क्षेत्रीय कार्यालय व प्रभाग क्रमांक दोनच्या नगरसेविका शीतल अजय सावंत यांच्या प्रयत्नातून कॉमरझोन ते भारत सावंत पेट्रोल पंपापर्यंतच्या रस्त्याच्या दुर्तफा असलेल्या भिंतीवर पुण्याच्या प्रेक्षणीय स्थळांसह, पाणी बचत, आरोग्य, झाडे लावा, स्वच्छता, मुली वाचवा, शैक्षणिक असे वेगवेगळे प्रबोधनापर संदेश रेखाटले आहेत. दोन्ही भिंतीना रंग देवून त्यावर ऐतिहासीक बंडगार्डन, लाल महाल, महात्मा फुले वाडा, शनिवार वाडा, आगाखान पॅले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सारसबाग, पर्वती , विश्रामबाग वाडा अशी ब्रिटिशकालनी वास्तूंची हुबेहुब चित्रे रेखाटली आहेत.

रस्त्यावरून जाताना शहराच्या ऐतिहासीक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्राची माहिती सहज उपलब्ध होत आहे. कोणाचीही  नजर चुकणार नाही, अशी ही चित्रे रस्त्यावरून ये-जा करणार्‍यांशी जणू बोलतच असल्याचा भास होत आहे. महापालिकेच्या शाळा किंवा खाजगी शाळांचे विद्यार्थ्यांना जर या रस्त्यावरून फेरफटका मारण्यास सांगितल्यास पुण्याचा सर्व इतिहासाची माहिती भिंतीवर पहायला मिळणार आहे.

एकीकडे भिंतीवर वेगवेगळ्या जाहिराती करून शहर विद्रुपीकरण केले जाते. मात्र अशा प्रकारे जर भिंतीचा वापर केल्यास नक्कीच पुणे शहराच्या सौंदर्यात भर पडेल व पुणे शहराची एक वेगळी ओळख निर्माण होईल.