Thu, Jul 18, 2019 02:31होमपेज › Pune › अडीच हजार आरोपी पुणे पोलिसांना ‘वॉन्टेड’

अडीच हजार आरोपी पुणे पोलिसांना ‘वॉन्टेड’

Published On: Mar 22 2018 1:45AM | Last Updated: Mar 22 2018 1:17AMपुणे : अक्षय फाटक

मोकाट सुटलेल्या गुन्हेगारांचे शहर अशी ओळख होऊ पाहत असणार्‍या सांस्कृतिकनगरीत पोलिसांना तब्बल अडीच हजार गुन्हेगार ‘वॉन्टेड’ असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच न्यायालयाने फरार घोषित केलेल्या 45 गुन्हेगारांचाही शोध पोलिस यंत्रणेला घेता आलेला नाही. धक्कादायक म्हणजे  सन 1976 पासून  यातील काही गुन्हेगारांचा थांगपत्ता लागलेला नाही. यामध्ये किरकोळ गुन्ह्यांसह गंभीर घटनांमधील आरोपींचा समावेश आहे. 

पुणे पोलिस आयुक्तालयाची स्थापना 1 जुलै 1965 रोजी झाली. पानशेतच्या पुरानंतर वाढलेल्या पुण्याला बंदोबस्तासाठी आयुक्तालय असावे, अशी शिफारस तत्कालीन प्रशासक स. गो. बर्वे यांनी केली होती. त्याची दखल घेऊन आयुक्तालय स्थापन करण्यात आले. आयुक्तालयांतगर्त काही मोजकी पोलिस ठाणी होती. मात्र, हळूहळू शहराची लोकसंख्या वाढली त्यानुसार पुणे पोलिस आयुक्तालयाचाही विस्तार झाला. मोजकी पोलिस ठाणी असणार्‍या शहरातील ठाण्यांची संख्या  39 वर गेली आहे. सध्याची ही संख्या पुरेशी नाही. त्यातही पुणे पोलिस दलात मनुष्यबळाची कमतरता आहे. त्या तुलनेत गुन्हेगारीचा आलेख दरवर्षी वाढत असून वर्षाला जवळपास 13 हजार गुन्ह्यांची नोद होत आहे. 

शहरात वर्षाला जवळपास सव्वाशे खुनाच्या घटना घडतात. मारामारी, लूटमार, तोडफोड आणि फसवणुकीच्या गुन्ह्यांनी यापूर्वीच उच्चांक गाठला आहे. बलात्कार, विनयभंग या घटनाही वाढत आहेत. याच शहरात अंधश्रद्धेविरोधात लढा देणारे डॉ. नरेद्र दाभोलकर यांची भर रस्त्यावर गोळ्या झाडून हत्या झाली. पुणे पोलिसांना मारेकरांचा पत्ताच लागला नाही. त्यामुळे हा तपास सीबीआयकडे देण्यात आला.

आयटी क्षेत्रातील नयना पुजारी,  ओपी राजू या तरुणींचा खून झाला. अशा एक ना अनेक गंभीर घटनांनी शहर भयभीत होत आहे.  दुसरीकडे शहरात टोळीयुद्धातून रक्तपात घडलेला पुणेकरांनी पाहिला आहे. पुणे पोलिसांच्या प्रयत्नांनंतर हे टोळीयुद्ध शांत झाल्याचे दिसून येते. मात्र पुणे पोलिसांना अशाच वेगवेगळ्या गुन्ह्यांमधील सन 1976 पासून तब्बल 2 हजार 538 आरोपी पाहिजे आहेत, तर न्यायालयाने फरार घोषित केलेल्या 45 गुन्हेगारांचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच गुन्हे शाखेच्या पथकाने वीस वषार्र्ंपासून पसार असलेल्या आरोपीला पकडले होते. मात्र, दुसरीकडे दरवर्षी ‘वॉन्टेड’ आरोपींची संख्या वाढत आहे.  

लोकसंख्येच्या तुलनेत मनुष्यबळ कमी

पुणे पोलिस दलात साडेदहा हजारांच्या जवळपास मनुष्यबळ आहे. 1961 नुसार हे संख्याबळ आहे. मनुष्यबळ वाढण्यासाठी शहरातील लोकसंख्या व  क्राईम रेट पाहिला जातो. मात्र, आता पुणे व पिंपरी चिंचवडची लोकसंख्या   65 लाखांवर गेली आहे.  त्यासोबतच क्राईम रेटही वाढत आहे. पण पुणे पोलिस दलात 58 वर्षांनंतरही मनुष्यबळात वाढ झालेली नाही. निवृत्ती व बदली झालेल्या कर्मचार्‍यांच्या जागा भरल्या जातात. मात्र लोकसंख्येनुसार मनुष्यबळ असणे आवश्यक आहे. परंतु सध्या ते कमी आहे.  पोलिस दलाला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची गरज  वरिष्ठ अधिकार्‍यांनी व्यक्त केली.

गंभीर गुन्ह्यांचा तपास नाहीच

कर्वे रस्त्यावरील सुरेश अलुरकर यांचा घरात घुसून झालेला खून (2008),  विद्यापीठातील सुरक्षारक्षकाचा खून, मित्रमंडळ चौकातील हरी ढमढेरे यांचा खून (2011), सदाशिव पेठेतील ज्येष्ठ महिला आशा लगड यांचा खून, तसेच जंगली महाराज रस्त्यावरील बिल्डर निखिल राणे (2009), आयटी इंजिनिअर दर्शन टोंगारे (2010) या गंभीर गुन्ह्यांतील आरोपींचा अद्यापही पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही.    

 

Tags ; Pune, Pune News, Crime, criminals, Wanted,