Wed, Apr 24, 2019 01:51होमपेज › Pune › पालिका अधिकार्‍यास दंड 

पालिका अधिकार्‍यास दंड 

Published On: Mar 07 2018 1:55AM | Last Updated: Mar 07 2018 1:14AMपिंपरी : प्रतिनिधी 

माहिती अधिकारात विचारलेली माहिती देण्यास मुदतीपेक्षा अधिक विलंब केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी एम. एम. शिंदे यांना राज्य माहिती आयोगाच्या पुणे खंडपीठाचे आयुक्त रवींद्र जाधव यांनी 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम वेतनातून त्वरित वसूल करण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत. आखिल महाराष्ट्र माहिती अधिकार समितीचे अध्यक्ष नितीन यादव यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे निगडीतील भक्ती-शक्ती समुह शिल्प चौक ते वाकडेवाडीपर्यंत पुणे- मुंबई जुन्या महामार्गावर पुरुष व स्त्रियांसाठी कोठे व किती स्वच्छतागृहे आहेत. त्याची संख्या  माहिती अधिकाराअंतर्गत मागितली होती. परंतु, पालिकेने मुदतीत माहिती दिली नाही. त्यामुळे यादव यांनी पालिकेकडे अपिल केले. परंतु, पालिकेने त्यावर सुनावणी घेतली नाही. तसेच अपुरी माहिती दिली. त्या विरोधात यादव यांनी राज्य माहिती आयोगाकडे तक्रार केली.

त्यावर झालेल्या सुनावणीला पालिका प्रशासनाकडून कोणीही हजर नव्हते. त्यामुळे आयोगाने सहायक आरोग्य अधिकारी शिंदे यांना मुदतीत माहिती न दिल्याने आणि माहिती अधिकाराचे उल्लंघन केल्याने 5 हजार रुपयांचा दंड का लावू नये याबाबत 10 दिवसात खुलासा करण्याचा आदेश दिला. परंतु, शिंदे यांनी त्याचा खुलासाही केला नाही. परिणामी, त्यांना 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम शिंदे यांच्या वेतनातून माहितीचा अधिकार या लेखाशिर्षाखाली जमा करण्याचे आदेश राज्य माहिती पुणे खंडपीठाचे आयुक्त जाधव यांनी पालिकेला दिला आहे.