Mon, Apr 22, 2019 04:14होमपेज › Pune › शिवसेनेवर वाढतोय युवा सेनेचा प्रभाव

शिवसेनेवर वाढतोय युवा सेनेचा प्रभाव

Published On: Mar 14 2018 1:20AM | Last Updated: Mar 14 2018 12:15AMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

शिवसेनेतील गरम रक्ताच्या तरुणांना अधिक वाव देण्यासाठी युवा सेनेच्या पदाधिकार्‍यांना शिवसेनेत महत्त्वाची पदे देण्याची खेळी शिवसेनेने केली आहे. पिंपरी-चिंचवडसह राज्यभर युवा सेनेच्या पदाधिकार्‍यांना सेनेची महत्त्वाची पदे दिली जात आहेत. त्यामुळे शिवसेनेवर आदित्य ठाकरे यांचा प्रभाव वाढत असल्याची चर्चा आहे.

शिवसेनेतील गरम रक्ताच्या तरुणांना राज ठाकरे यांच्या मनसेचे वाटणारे आकर्षण, राजशी तुलना करता त्यांना निष्प्रभ वाटणारे उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व यामुळे शिवसैनिक हळूहळू मनसेकडे वळू लागले. सन 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने 13 जागा जिंकल्या,  त्याबरोबरच अनेक मतदारसंघांत सेना-भाजपच्या पराभवास हातभार लावला. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनसेला थोपविण्यासाठी शिवसेनेने 2010 च्या दसरा मेळाव्यात युवा सेनेच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. आदित्य ठाकरे यांच्याकडे या संघटनेची धुरा सोपविण्यात आली. दरम्यानच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे शिवसेना काही वर्षे मागे गेली. या धक्क्यातून सावरत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांचे मेळावे, संघटनात्मक बांधणीवर भर देऊन पक्षाला काही प्रमाणात नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला. या धावपळीत युवा सेनेच्या बांधणीकडे मात्र दुर्लक्ष झाले. 

पक्षातील ज्येष्ठांना डावलून आदित्य ठाकरे यांची शिवसेना नेतेपदी निवड करण्यात आली तेव्हा सेनेतील घराणेशाहीवर विरोधक व माध्यमांनी टीकास्त्र सोडले. आता आपल्याला काम करून दाखवावे लागेल हे लक्षात घेऊन आदित्य ठाकरे चांगलेच सक्रिय झाले. मुंबईत युवा सेनेचे समाधान सरवणकर, अतुल दिघे नगरसेवकपदी निवडून आले. यापाठोपाठ युवा सेनेच्या टीमवर महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघनिहाय महत्त्वाच्या जबाबदार्‍या दिल्या गेल्या. शिवसेना संपर्कप्रमुख नियुक्त करताना युवा सेनेला महत्त्व दिले गेले. त्यामुळे एरवी फक्त मुंबईपुरता कार्यक्षेत्र व प्रभाव असणारे युवा सेनेचे शिलेदार मुंबईतून बाहेर पडून  राज्यभर शिवसेनेतील महत्त्वाच्या पदांची जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत.  युवा सेनेचे कोअर कमिटी सदस्य असलेले बाळा कदम यांच्याकडे पिंपरी-चिंचवड शिवसेनेचे संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे; तसेच युवा सेनेचे मावळ, पिंपरी, चिंचवडसाठी विस्तारक म्हणून काम पाहत असलेल्या वैभव थोरात यांच्याकडे चिंचवड विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

युवा सेना आणि शिवसेना यांच्यात समन्वय राहावा; तसेच शिवसेनेचे जुने कार्यकर्ते आता वयाने थकले आहेत हे लक्षात घेता शिवसेना म्हणजे तरुणांची सेना हे वैशिष्ट्य लोप पावता कामा नये, असा सेनेचा प्रयत्न आहे. त्यासाठीच युवा सेनेच्या टीमकडे शिवसेनेची महत्त्वाची पदे दिली जात असल्याची चर्चा आहे.

शिवसेनेच्या अंगीकृत संघटना विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यात मराठी माणसाला बँकिंगसारख्या क्षेत्रात वाव मिळावा यासाठी स्थानीय लोकाधिकार समिती, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी भारतीय विद्यार्थी सेना, कामगार क्षेत्रात कार्यरत भारतीय कामगार सेना, महाराष्ट्र श्रमिक सेना, म्युनिसिपल कर्मचारी सेना, शिक्षक सेना अशा संघटनांच्या माध्यमातून सेनेने विविध क्षेत्रे पिंजून काढली आहेत. आता युवा सेनेच्या माध्यमातून तरुणांना आपल्याकडे ओढण्याचा सेनेचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे पक्षवाढीसाठी भविष्यात चांगली माणसे शिवसेनेत घ्यावीच लागतील, अशी भूमिका घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयातांना पायघड्या घातल्याने सेनेत भविष्यात जुने व नवे असा वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत.