Mon, Apr 22, 2019 12:00होमपेज › Pune › महागाईने लग्नघरचे बजेट कोलमडले

महागाईने लग्नघरचे बजेट कोलमडले

Published On: Apr 24 2018 1:40AM | Last Updated: Apr 24 2018 1:10AMपिंपरी : पूनम पाटील

सध्या उन्हाचा कडाका वाढतच असून महागाईही गगनाला भिडली आहे. अक्षयतृतीयेनंतर पुन्हा विवाहांना सुरुवात झाली असून वधुपित्यांना मात्र महागाईने घाम फोडला आहे. दिवसेंदिवस प्रत्येक वस्तूची किंमत कमी न होता वाढतच आहे. त्यातच नोटबंदी तसेच जीएसटी यासारख्या निर्णयामुळे स्वतःचे हक्काचे पैसेही वेळेवर मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे वधुपित्यांना ऐन लग्नसराईत घाम फुटला आहे. 

वधुपित्यांना मुलीसाठी योग्य वर शोधण्यासाठी सहा महिने आधीच पायपीट करावी लागते. परंतू एकदा लग्न ठरले तर ते विनाविघ्न पार पाडावे; यासाठी मुलीचे वडील मुलीच्या डोक्यावर अक्षता पडून आपण केंव्हा जबाबदारीतून मुक्त होतो. या चिंतेत असतात. त्यातच हल्ली तरुण वयातच मुलामुलींचे घर सोडून परस्पर विवाह करण्याचे प्रस्थ वाढल्याने अनेक वधुवरांच्या घरी पसंती झाल्यानंतर लगेचच विवाह उरकण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे पसंतीनंतर आठ दिवसात लग्नाची तयारी करतांना वधुपिता; तसेच मुलाकडच्या घरच्याचेहि अंदाजपत्रक डळमळीत होतांना दिसत आहे. वर संशोधनाच्या तयारीत लागलेल्या वधुपित्यास महागाई आकाशाला भिडली असल्याने लग्न ठरल्याचे सुखही या उन्हाळ्यात घाम फोडणारे ठरत आहे.

शहरातील मंगलकार्यालये, वांजत्री, फोटोग्राफर, डेकोरेशन यासाठी वधुपित्यांची धांदल उडली असून गोरगरीब व मध्यमवर्गीय वधुपित्यांना मुलीच्या लग्नासाठी लागणारे साहित्य जमा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. वरपक्षाच्या अपेक्षा पूर्ण करण्याबरोबरच 1000 लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी 40 ते 50 हजार रुपये मोजावे लागत आहेत. याशिवाय मुलीसाठी संसार बादली, मंगल कार्यालय, भेटवस्तू, मंडप, घराची रंगरंगोटी यासारख्या अनंत गोष्टी करतांना लग्नघरी वधुपित्याला घाम फुटत असल्याचे चित्र आहे.