Sat, Jul 20, 2019 15:08होमपेज › Pune › हॉटेलसमोरील पार्किंगने जीव झाले स्वस्त

हॉटेलसमोरील पार्किंगने जीव झाले स्वस्त

Published On: Jun 27 2018 1:57AM | Last Updated: Jun 27 2018 12:48AMखेड शिवापूर : वार्ताहर

पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर परिसरात शिंदेवाडी ते सारोळादरम्यान असणार्‍या हॉटेल व्यावसायिकांनी सेवा रस्त्यालाच पार्किंगचे स्वरूप दिले आहे. त्यामुळेच वारंवार अपघाताला निमंत्रण दिले जात आहे, हे सोमवारी (दि. 25) घडलेल्या अपघातावरून स्पष्ट होत आहे. या अपघातात अश्विनी वसंत असवले (वय 52, रा. स्वारगेट पुणे), उज्ज्वला रवींद्र सणस (वय 60, रा. चंदननगर, खराडी, पुणे), अरुणा शिपीजल भोसले (वय 54, रा. कात्रज बायपास, पुणे) आणि चालक ओंकार पोळ (वय 26, रा. शिंदेवाडी, ता. भोर) अशा चार जणांचा बळी गेला आहे.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, खेड शिवापूर बंगला थांबा संपला की, सुमारे 400 मीटरवर सेवारस्ता संपला आहे. रस्त्याच्या एका बाजूला पेट्रोल पंप असून त्यालाच चिटकून हॉटेल सागर आहे. हॉटेलच्या बाहेर सुरक्षारक्षक नसल्याने महामार्गाच्या कडेला सर्रास मोठ्या प्रमाणात गाड्या थांबवून चालक जेवणासाठी जातात. पार्किंग केलेल्या गाड्यांचे प्रमाण जास्त असल्याने रस्त्यावरून येणार्‍या वाहनाला रस्त्याचा अंदाज येत नाही व अपघाताला निमंत्रण मिळते. त्यातच आजपर्यंत त्याठिकाणी सेवा रस्ता का केला गेला नाही याची कल्पना कोणालाच नाही. याच ठिकाणी सुमारे तीन महिन्यांपूर्वी शिवरे (ता. भोर) येथील नीलेश डिंबळे व इसाक कारजगी अशा दोघांचा बळी गेला होता. विशेष म्हणजे या रस्त्यादरम्यान उदरनिर्वाह करण्यासाठी लहान-मोठ्या टपर्‍या रस्त्याच्या मधोमध उभ्या असून याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, तसेच महामार्ग पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.

या थांबलेल्या वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे, असे स्थानिक नागरिक तसेच पत्रकारांनी वेळोवेळी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले होते. परंतु त्यावर काहीच कारवाई केली जात नव्हती, ही दुर्दैवाची बाब आहे. सोमवारी घडलेल्या घटनेमुळे मंगळवारी (दि. 26) रस्त्यावरील थांबलेल्या गाड्यांवर पोलिसांनी  कारवाई सुरू केली. हीच कारवाई या अगोदर केली असती तर चार जणांचा बळी गेला नसता, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दै. ‘पुढारी’च्या पत्रकाराजवळ व्यक्‍त केली.

संयुक्त कारवाईची गरज

यादरम्यान महामार्गावर थांबलेल्या वाहनांवर तसेच अनधिकृतपणे उभ्या केलेल्या टपर्‍यांवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महामार्ग पोलिस, स्थानिक पोलिस व रिलायन्स इन्फ्रा यांनी संयुक्तपणे कारवाई करणे गरजेचे आहे. यापुढे असे अपघात टाळण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे हे विसरता कामा नये. एकूणच या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या हॉटेल सागरचे मालक व अनधिकृतपणे उभ्या केलेल्या ट्रकच्या चालकावर कारवाई झाली पाहिजे हे नागरिकांच्या चर्चेतून पुढे येत आहे.