Tue, Jul 16, 2019 01:36होमपेज › Pune › शिक्षण व उद्योग संगमातून उद्योगक्षेत्राची झेप

शिक्षण व उद्योग संगमातून उद्योगक्षेत्राची झेप

Published On: Feb 02 2018 1:43AM | Last Updated: Feb 02 2018 1:43AMपिंपरी : प्रतिनिधी 

शिक्षण व उद्योग या क्षेत्राची सांगड घालत नाही तोपर्यंत  उद्योगक्षेत्र झेप घेऊ शकत नाही. देशातील ही कमतरता दूर करून शैक्षणिक संस्था, विद्यापीठ आणि उद्योगांमध्ये समन्वय वाढीची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी (दि.1) येथे केले. 

केंद्र शासनाच्या सुक्ष्म, लघू व मध्यम मंत्रालय आणि इंजिनिअरिंग क्लस्टरच्या पुणे विभागातर्फे चिंचवड येथील इंजिनिअरिंग क्लस्टर येथे आयोजित लघुउद्योजकांच्या  ‘नॅशनल व्हेंडर डेव्हल्पमेंट प्रोग्राम’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी इंजिनिअरिंग क्लस्टरचे राष्ट्रीय संचालक आर. बी. गुप्ते, पुणे विभागाचे संचालक सागर शिंदे, सुलभा उबाळे, योगेश बाबर आदी उपस्थित होते. 

देसाई म्हणाले की, शिक्षणास उद्योगाची जोड मिळाल्यास संशोधन वाढून उद्योगक्षेत्र वाढीस चालना मिळते. केवळ शिक्षणातून नोकरी व उद्योग निर्माण करता येत नाही. त्यासाठी कौशल्य आवश्यक आहे. त्या दृष्टीने राज्य शासन प्रयत्न करीत आहे. नवी मुंबईत उद्योग केंद्र सुरू करून तेथे नवोदित लघुउद्योजकांना उद्योग निर्मितीपासून प्रत्यक्ष उद्योग सुरू करेपर्यंतचे सर्व प्रकारचे प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाणार आहे. 

क्लस्टरमुळे नवउद्योजकांना चालना मिळते. त्या ठिकाणीच प्रयोगशाळा व प्रमाणपत्र वितरणाची सोय केल्याने लघुउद्योजकांना आपला प्रमाणित केलेला माल देशासह विदेशातही निर्यात करता येणार आहे.नवउद्योजकांना चालना देण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणचे क्लस्टर साह्यभूत ठरत आहेत. नवउद्योजकांनी पुढे येऊन विविध समस्या सोडविणारे प्रकल्प, कल्पना व संशोधन समोर आणावे. कचर्‍याची विल्हेवाट लावणे, त्यापासून इंधन तयार करणे व इतर पर्यायाचा शोध घेणे, मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणार्‍या वीजनिर्मिती प्रकल्पासाठी सौरऊर्जा निर्मितीवर भर दिला जात आहे. सौरऊर्जा पॅनेलचे साहित्य परदेशातून निर्यात करावे लागते. त्यावर संशोधन होऊन देशात त्याचे उत्पादन झाल्यास वीजनिर्मिती स्वस्त होईल. या दृष्टीने नवउद्योजक आणि विद्यार्थ्यांनी संशोधन करून प्रकल्प सादर करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

कार्यक्रमात ‘स्टार्ट अप’अंतर्गत सामंजस्य कराराच्या प्रतींचे वाटप देसाई यांच्या हस्ते चार लघुउद्योजकांना करण्यात आले.

पक्षाने आदेश दिल्यास मंत्री तासभरही सत्तेत राहणार नाहीत : देसाई

शिवसेना 2019 ची लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहे, ही काळ्या दगडावरील भगवी रेघ आहे. पक्षाने आदेश दिला की, शिवसेनेचे सर्व मंत्री एक दिवस काय, एक तासही सत्तेत न राहता राजीनामा देतील, असा विश्‍वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.  चिंचवड येथील लघुउद्योजकांच्या प्रदर्शनानिमित्त आले असता, ते पत्रकारांशी बोलत होते. देसाई म्हणाले की, राजीनामा देण्याबाबत पक्ष योग्य वेळी निर्णय घेईल.

राज्यात 14 क्लस्टर

राज्यात एकूण 14 क्लस्टर आहेत. त्यांचा नुकताच सर्व्हे झाला आहे. चिंचवड येथील क्लस्टरमध्ये 24 तास काम चालते. एमआयडीसी, भोसरीतील निवृत्त महासैनिक क्लस्टरमध्ये दुसर्‍या मजल्यापर्यंत अवजड मालवाहू ट्रॅक ये-जा करू शकतो, असा अद्ययावत रॅम्प आहे. काही क्लस्टरमध्ये उत्पादनाची तपासणी करणार्‍या प्रगोगशाळाही आहेत. मागील व्हेंडर डेव्हलम्पमेंट प्रोग्राममध्ये 350 लघुउद्योजकांनी सहभाग घेत तब्बल 400 कोटींची उलाढाल झाली होती, असे आर. बी. गुप्ते यांनी सांगितले.