Thu, Feb 21, 2019 13:05होमपेज › Pune › उद्योगपती आनंद महिंद्रांकडे सामूहिक बलात्कार पीडितेने मागितली मदत

उद्योगपती आनंद महिंद्रांकडे सामूहिक बलात्कार पीडितेने मागितली मदत

Published On: Apr 22 2018 1:29AM | Last Updated: Apr 22 2018 1:26AMपुणे : देवेंद्र जैन

शहरातील एका सामूहिक बलात्कार पीडितेने उद्योगपती आनंद महिंद्रा यांना ट्वीटच्या माध्यमातून मदत मागितल्याचे कळते. 

देशात सद्य:स्थितीत उन्नाव व काश्मीर येथे झालेल्या बलात्काराचे प्रकरण गाजत आहे. काही दिवसांपूर्वी आनंद महिंद्रा यांनी या बलात्काराबाबत एक ट्वीट केले होते, त्यात त्यांनी अशा घटना घडल्यानंतर त्यांचे रक्त उसळते आणि यातील दोषींना फाशी देण्याकरिता ते जल्लाद होण्यास तयार आहेत, असे म्हटले आहे. त्यावर देशातून बर्‍याच प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, महिंद्रा हे विसरले की, त्यांच्या पुणे येथील कंपनीमधील एका महिला कर्मचार्‍यावर त्यांच्याच कंपनीतील काही जणांनी सामूहिक बलात्कार केला होता, त्या वेळी ते निद्रिस्त होते का? असा प्रश्न या पीडितेने उपस्थित केला आहे. सदर पीडितेला महिंद्रा यांच्या कंपनीने काहीही मदत केली नाही. मदतीकरिता ही पीडिता दारोदारी भटकत आहे. या पीडितेने महिंद्रा यांच्या कंपनीच्या कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संपर्क केला, पण त्यांनी काहीही दाद लागू दिली नाही. 

तिने महिंद्रा यांना संपर्क करण्याकरिता सर्व अधिकार्‍यांच्या कार्यालयाच्या पायर्‍या  झिजवल्या, पण या मुजोर अधिकार्‍यांनी तिला काहीही मदत केली नाही, एवढेच काय तर महिंद्रा यांचा मेल आयडीही दिला नाही. शेवटी तिने कंपनीचे संचालक विनित नय्यर यांना पत्र लिहून तिच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत वाचा फोडली. महिंद्रा यांनी ट्वीट करण्यापूर्वी आपल्याच कंपनीतील बलात्कार पीडितेचा विचार केला असता, तर त्यांच्या या ट्वीटचा नागरिकांनी आदर केला असता. हे ट्वीट म्हणजे स्वतःला प्रसिद्धी मिळवण्याकरिता केलेला हा स्टंट आहे, असे एका प्रसिद्ध वकिलांनी नाव न छापण्याच्या अटीवर म्हटले आहे.