Thu, Aug 22, 2019 14:51होमपेज › Pune › तंत्रशिक्षणात आता औद्योगिक प्रशिक्षण

तंत्रशिक्षणात आता औद्योगिक प्रशिक्षण

Published On: May 16 2019 2:10AM | Last Updated: May 16 2019 1:31AM
पुणे : प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या ’आय स्किम’ अभ्यासक्रमातील (एमयु,पीएस अभ्यासक्रम वगळून) विद्यार्थ्यांनी चौथ्या सत्रानंतर व पाचवे सत्र सुरु होण्यापूर्वी सहा आठवड्यांचे औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार गुरूवार, दि.16 मे ते येत्या 26 जूनपर्यंत राज्यातील तब्बल 67 हजार विद्यार्थी 10 हजार 242 कंपन्यांमध्ये औद्योगिक प्रशिक्षण घेणार आहेत.

यापूर्वी विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर औद्योगिक कंपन्यांमध्ये काम शोधावे लागत होते. परंतु, राज्य तंत्र शिक्षण मंडळाने अभ्यासक्रमातच सहा आठवड्यांचे औद्योगिक प्रशिक्षण अनिवार्य केल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण होण्याअगोदरच कंपन्यांमधील कामाचा अनुभव घेता येणार आहे. प्रशिक्षणाच्या काळात विद्यार्थी तेथील कामाशी आणि वातावरणाशी एकरूप होणार आहेत. औद्योगिक प्रशिक्षणासाठी राज्यस्तर, विभागीय स्तर आणि जिल्हास्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये दूरध्वनी,  एस.टी महामंडळ, जिल्हा उद्योजकता केंद्र, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या संस्थांचे प्रत्येकी एक प्रतिनिधी आणि तंत्रनिकेतनचे प्राचार्य यांचा समावेश करण्यात आला आहे. समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी समितीची मदत होणार आहे.

डिप्लोमाची प्रवेश प्रक्रिया ‘डीटीई’मार्फत

राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी राबविल्या जाणार्‍या डिप्लोमा अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया यंदा राज्य सामाईक प्रवेश परिक्षा कक्षामार्फत राबविण्यात येणार नसून तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत (डीटीई) राबविण्यात येणार आहे. त्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत आत्तापासूनच हालचाल सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदा डिप्लोमा तंत्रनिकेतची प्रवेशप्रक्रिया लवकरच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

करिअर फेअरचे आयोजन...

राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी सर्व शासकीय तंत्रनिकेतनांना करिअर फेअर आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेेत. यामध्ये इयत्ता दहावीनंतर विद्यार्थ्यांचे प्रवेश शासकीय तंत्रनिकेतमध्ये व्हावेत यासाठी सर्व शासकीय तंत्रनिकेत ग्रामीण भागात जाऊन विद्यार्थी आणि पालकांचे मेळावे घेणार आहेत. यामध्ये तंत्रशिक्षणामध्ये प्रवेशाच्या संधी आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर असणार्‍या नोकरीच्या संधी याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे. त्यांनी जवळच्या शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांशी संपर्क करावा, असे आवाहन देखील राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.