होमपेज › Pune › मावळात मुसळधार; इंद्रायणीला पूर

मावळात मुसळधार; इंद्रायणीला पूर

Published On: Jul 17 2018 1:36AM | Last Updated: Jul 17 2018 12:55AMलोणावळा : वार्ताहर

गेल्या दोन दिवसांपासून मावळ परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. मावळातील वडगाव, तळेगाव, कामशेत, पवनानगर, कार्ला, इंदोरी आदी भागातील ओढे व नद्या ओसंडून वाहत आहेत. इंद्रायणी नदीस पूर आला असून, अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.  पर्यटननगरी म्हणून ओळख असणार्‍या लोणावळा शहरात मुसळधार पाऊस पडत असून मागील 32 तासात येथे तब्बल 385 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. 

या पावसामुळे शहरातील अनेक सखल रहिवासी भागात पाणी भरले असून, अनेक घरांमधूनही पाणी शिरले आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर दुसरीकडे उद्योगनगरी पिंपरी- चिंचवडसह मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणार्‍या पवना धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. तालुक्यातील वडिवळे धरण 77% भरले असून, त्यातून पाण्याचा विसर्ग कुंडलिका नदीमध्ये करण्यात येत आहे. शिवाय आंद्रा धरण 87.31% तर कासारसाई धरण 81.20% भरले आहे. 

लोणावळ्यातील तुंगार्ली, लोणावळा, वलवन या धरणातील पाणी साठ्यातही मोठी वाढ झाली आहे. कामशेत जवळ इंद्रायणी नदीला पूर आला आहे. पुढे नाणे पुलाजवळील रस्ता पाण्याखाली गेल्याने त्याभागातील अनेक गावांचा संपर्क ही तुटला होता.लोणावळा शहराच्या जवळच असलेल्या कुणे गाव येथील राजमाची किल्ला आणि परिसराला जोडणारा रस्ता देखील दोन दिवसांपासून पाण्याखाली असून या रस्त्यावर तीन ते चार फूट पाणी भरले आहे.  संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याकडे याबाबत वारंवार तक्रारी करूनही त्यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याची तक्रार येथील आदिवासी नागरिक करीत आहे.  

लोणावळ्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्‍वभूमीवर लोणावळा शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी सुजाता देशमाने यांनी सुरक्षेच्या कारणास्तव शहरातील सर्व शाळांना मंगळवारी (दि. 17) रोजी सुट्टी जाहीर केली आहे. याविषयीची सूचना सर्व संबंधित शाळातील मुख्याध्यापकांना केल्याची माहिती देशमाने यांनी दिली. 

कुंडमळा पुलाकडे जाणारा मार्ग पाण्याखाली

इंदोरी कुंडमळा येथील इंद्रायणी नदी वरील पुलाकडे जाणारा मार्ग जोरदार पावसामुळे पाण्याखाली गेला आहे.  त्यामुळे इंदोरी, कन्हेवाडी, कुंडमळा, परिसरातील रहिवाशांना इंदोरी- घोरावाडी मार्गे भेगडेवाड़ी परिसरात जावे लागत आहे; तसेच भेगडेवाड़ी परिसरातील नागरिकांना कुंडमळा. इंदोरी गावांचा संपर्क तुटला   आहे. या परिसरात गेले दोन-तीन दिवस पावसाची संततधार सुरू आहे; तसेच लोणावळा भागात पाऊस सतत चालु असल्यामुळे इंद्रायणी नदीला पुर आला आहे.  अशा परिस्थितीत काही दुचाकी वाहनधारक कुंडमळा येथे येवून पुन्हा पाण्याखाली गेलेल्या पुलावरून ये-जा करत आहेत. काही टवाळखोर तरुण पर्यटक धोका पतकरूँन पाण्यामधून वाहन काढ़ण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. र बेतू शकतो .  

कुंडमळा परिसरात मोठ्या प्रमाणात रांजनखळगे असल्यामुळे पर्यटकांची वर्दळ असते. पुरातन कुंडदेवीचे मंदिर पाण्यात असल्यामुळे पर्यटकांना येथे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.  रस्त्याच्यालगत मोठ मोठी रांजनखळगी   आहेत.  त्याचा अंदाज न घेता चालक सुसाट वाहने नेताना दिसतात.स्थानिकांनी धोक्याचे फलक देखील लावले आहेत.येथून ये-जा करण्यार्‍यांनी इतर मार्गे वाहतूक करण्याच्या सूचना येथील स्थानिक वाहनचालकांना देत आहेत. कुंडमळा जेवढा विलोभनीय आहे तेवढाच धोकादायक देखील आहे. सुरक्षाविषयक फलकाजवळ थांबून लोक सेल्फी काढतात तेथे लिहलेल्या धोकादायक सूचना वाचत नाहीत.पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते सूचना देत असतात त्याकडे पर्यटक दुर्लक्ष करतात. प्रशासन सर्व उपाययोजना करत आहे. त्यामुळे पर्यटकांनी अतिधाडस न दाखविता पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते दिलीपडोळस यांनी केले आहे. 

वडिवळेतील इंद्रायणीवरील पूल पाण्याखाली

मागील दोन दिवसांपासून  पावसाचा जोर वाढल्याने नद्या व ओढ्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून कामशेत परिसरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत . इंद्रायणी नदीची पाणी पातळी वाढल्याने, इंद्रायणी नदीवरील वडिवळे येथील पूल रविवारी (दि. 16) दुपार पासून पाण्याखाली गेल्याने पुढील सात गावांचा संपर्क रविवारपासून तुटलेला आहे

कामशेत-संगीशे रस्त्यावरील इंद्रायणी नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने सकाळी घरातून बाहेर पडलेले नोकरदार वर्ग, विद्यार्थी, दुग्धव्यावसायिक व शेतकरी कामशेतमध्येच अडकून पडले आहेत, यामुळे पुलाच्या पुढील सात गावांतील लोकांची मोठी गैरसोय होत आहे. इंद्रायणी नदीवरील वडिवळे जवळील या  पूलाची उंची कमी असल्याने  दरवर्षी पावसाळ्यात पाच ते सहा वेळा पाण्याखाली जातो यामुळे पावसाळ्यात परिसरातील सात गावांच्या दळणवळनाच्या कार्यात अडथळे येतात व याचा विपरीत परिणाम शालेय विध्यार्थी , नोकरदार ,दुग्धव्यावसायिक इतरावर होत असतो . 

दरवर्षी ह पूल पाण्याखाली जात असून सुद्धा प्रशासन येथे नवीन पूल बांधत नाहीत व स्थानिक लोक दरवर्षी निवेदने देत असतात पण या ठिकाणी पूल बाधण्यात मात्र कोणी लक्ष देत नाहीत यामुळे अनेक वर्षांची हि समस्या कधी सुटणार असा प्रश्न सात गावातील ग्रामस्थांना पडला आहे.