Sat, Apr 20, 2019 10:15होमपेज › Pune › इंद्रायणीकाठी हरिनामाचा गजर

इंद्रायणीकाठी हरिनामाचा गजर

Published On: Jul 07 2018 1:36AM | Last Updated: Jul 07 2018 1:26AMआळंदी : श्रीकांत बोरावके

संपत्ती सोहळा नावडे मनाला । 
लागला टकळा पंढरीचा ॥1॥
जावें पंढरीसी आवडी मनासी । 
कईं एकादशी आषाढी ये हें ॥2॥
तुका म्हणे ऐसें आर्त ज्याचे मनीं ।
त्याची चक्रपाणी वाट पाहे ॥3॥

या समर्पक ओवीच्या आविर्भावात चेहर्‍यावर प्रवासाचा शीण जराही उमटू न देता वारकरी दिंडीबरोबर चालत आपल्या गावांतून आळंदीत दाखल झाले असून, हा उत्साह राखत माउलींना पंढरपूरला घेऊन जाण्यासाठी जवळपास पाचशे दिंड्या आळंदीत दाखल झाल्या आहेत. कपाळी बुक्का किंवा चंदनाचा टिळा, हातात झांजा किंवा एकतारी, गळ्यात तुळशीच्या माळा, मुखी विठ्ठलाचे नाम, ज्ञानेश्वरांच्या ओव्या किंवा तुकारामांचे अभंग, भक्तिरसात न्हालेले मन आणि ऊन-पाऊस-वादळ-वारा यांना न जुमानता विठुरायाच्या ओढीने पायी अंतर पार करण्यासाठी आसुसलेली पावले असे हे जनताजनार्दनाचे रुपडे दिंड्यामध्ये दिसून येत आहे.

राज्याच्या विविध भागांतून दिंड्या आज होणार्‍या प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत दाखल झाल्या आहेत. त्यांच्या आगमनाने इंद्रायणी घाट दुतर्फा भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. ‘राम कृष्ण हरी... माउली माउली’च्या नामघोषाने इंद्रायणी घाट दुमदुमून गेला होता. महिला-पुरुष फुगड्यांचा फेर धरत हरिनामावर थिरकत होते. भजने - भारुडेदेखील घाटावर सुरू होती.माउली मंदिर परिसर व इंद्रायणी घाट वगळता आळंदीत वारकर्‍यांची गर्दी तुरळकच दिसून येत होती. वृद्धांची संख्या अधिक दिसून येत होती, तर त्या मानाने महिला व तरुणांची संख्या कमी दिसून येत होती. गतवर्षीच्या वारीत महिला व तरुणांच्या संख्येत सर्वाधिक वाढ होती, ती यंदा ओसरल्याचे दिसून आले.

पोलिसांच्या वतीने मंदिराकडे जाणार्‍या सर्व रस्त्यांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिंड्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींना पासशिवाय मंदिर परिसरात प्रवेश दिला जात नव्हता. यंदा कमी गर्दी असल्याने काहीसा ताण कमी असला तरी पोलिसांकडून घातपात घडू नये याकरिता विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. वाहतूक व्यवस्था चोख राखण्यात आली होती.  आषाढी वारीनिमित्त आळंदीला येण्यासाठी ‘पीएमपीएल’च्या जादा बसगाड्या सोडण्यात आल्या होत्या. हडपसर, पुणे रेल्वेस्थानक, महापालिका भवन, स्वारगेट, निगडी, पिंपरी-चिंचवड, देहूगाव, भोसरी, रहाटणी आदी स्थानकांवरून गाड्या उपलब्ध होत्या. एस. टी. महामंडळाकडूनदेखील जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने वारकर्‍यांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शासनाचे फिरते आरोग्य पथकही आळंदीत दाखल झाले होते. आगीसारख्या घटना घडू नयेत याकरिता पुणे महानगरपालिकेचे अग्निशामक पथक व कर्मचारीही तैनात करण्यात आले होते.दरम्यान, दिंड्यांचे आळंदीत आगमन झाले असून, उद्या माउलींसोबत दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होणार असल्याने पालखी मार्गावर स्वागत कमानी, फलक उभारण्यात येत होते.