Wed, Mar 27, 2019 04:30होमपेज › Pune › ‘जलपर्णीमुक्‍त इंद्रायणी’चा युवकांचा ध्यास 

‘जलपर्णीमुक्‍त इंद्रायणी’चा युवकांचा ध्यास 

Published On: Feb 28 2018 1:13AM | Last Updated: Feb 28 2018 12:05AMइंदोरी : ऋषिकेश लोंढे 

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नदी ही जीवनदायिनी मानली जाते. या नद्यांच्या काठांवरच विविध शहरे, संस्कृती वाढली. आता हीच शहरे या नद्यांच्या बकालपणास तसेच प्रदुषणास कारणीभूत ठरत आहेत. त्यातच जलपर्णीनामक राक्षसाने नदीपात्रांना विळखा घातला असून, जलचरांचे जीवन धोक्यात आले आहे.   या प्रश्‍नी निव्वळ प्रशासनास दोष न देता आपणही जलपणीमुक्त नदीसाठी काहीतरी केले पाहिजे, हा उद्देश ध्यानी घेत इंदोरीतील युवकांनी ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून परिसरातील इतर तरूणाांन आवाहन करत ‘जलपर्णीमुक्‍त इंद्रायणी’ मोहिम सुरु केली आहे. 

 इंद्रायणी नदीचा उगम लोणावळा येथील कुरवंडे डोंगरावरील नागफणीजवळ आहे. उगमापासून काही किलोमीटर अंतरानंतर नदीचे पात्र प्रदूषित झाले आहे. सर्वत्रच प्रदूषित झालेले दिसून येत आहे. प्रसिद्धी माध्यमातून केवळ नदी प्रदूषणाचा बातम्या येत असतात. बातम्या वाचून अनेकजण संबंधित प्रशासनास केवळ नावे ठेवण्याचे; तसेच चर्चा करण्याचे काम करतात. ‘सोशल मीडीया’तून नदी प्रदुषणाचे केवळ फोटो आणि संदेश फिरवले जातात. त्यापलीकडे कोणीही नदी प्रदूषण नष्ट होण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही; परंतु याला अपवाद ठरले ते इंदरोरी आणि कुंडमळा येथील काही युवक. या युवकांनी एकत्र येत नदी प्रदूषणावर केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कृती करण्यात पुढाकार घेत इंदोरीपासून इंद्रायणीच्या पात्रातील जलपर्णी हटविण्यास सुरुवात केली आहे. ‘इंद्रायणी प्रदूषणमुक्त’चा ध्यास घेत या तरूणांनी परिसरतील तरूणाईस देखील ‘सोशल मीडिया’द्वारे या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 

इंद्रायणी उगमापासूनच प्रदूषित होत असेल, तर ती पुढे कितीही स्वछ करण्याचा प्रयत्न केला तर ती स्वछ होणार नाही, अशी ओरड इंद्रायणीकाठच्या अनेक गावातून होत होती. परंतु प्रदूषणमुक्त नदीसाठी कोणीही पुढे येत नव्हते. त्यामुळे या तरुणांनी इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यातचा विडा उचलला आहे. नदीपात्रास जलपर्णीचा विळखा पडला आहे. जलपर्णीमुळे नदीपात्र हिरवेगार झाले आहे. पाणी साठल्याने काठच्या अनेक गावातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे; तसेच मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

या जलपर्णी नामक राक्षसापासून इंद्रायणी ला वाचवण्याचे काम इंदोरी-कुंडमळा परिसरातील तरुणांनी युद्ध पातळी वर घेतले आहे.गेले काही दिवस हे काम चालू आहे.त्याना मावळ परिसरातील इंद्रायणी काठी बसलेल्या गावातील तरुणांनी साथ दिली पाहिजे ; प्रदूषित होऊ नये म्हणून जनजागृती होणे गरजेचे आहे. अशी अपेक्षा या तरुणांनी ’पुढारी’ शी बोलताना व्यक्त केली.