Tue, Mar 19, 2019 11:24होमपेज › Pune › इंदिरा गांधी उड्डाणपुलाचे  होणार ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’

इंदिरा गांधी उड्डाणपुलाचे  होणार ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी कॅम्प, लिंक रस्ता व पुणे-मुंबई जुन्या महामार्गास जोडणार्‍या पिंपरी येथील लोहमार्गावरील इंदिरा गांधी उड्डाणपुलाचे बांधकाम धोकादायक झाल्याने त्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’ केले जाणार आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरातील हा पहिला उड्डाणपूल आहे. या उड्डाणपुलामुळे पिंपरी कॅम्प व चिंचवड लिंक रस्ता आणि पुणे-मुंबई महामार्ग जोडला गेला आहे. पुलास चार बाजूने पोहोच रस्ते आहेत. त्यामुळे येथे नेहमी मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. या पुलास सुमारे 35 वर्षे झाली आहेत. त्यामुळे पुलाची सद्यःस्थितीमध्ये ठिकठिकाणी पडझड होत आहे. पुलाचे कठडे तुटून पडत आहेत; तसेच पुलाच्या स्लॅबचा काही भाग पडला आहे. या संदर्भात ‘पुढारी’ने अनेक वेळा छायाचित्रांसह वृत्त प्रसिद्ध केले आहे.

त्यामुळे महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. पुलाचे लवकरात लवकर ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’ करून करून देखभाल-दुरुस्ती आवश्यक असल्याचे महापालिकेचे मत बनले आहे. महापालिका ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’ (कंडिशनल सर्व्हे विथ एनडीटी) करून सादर केलेल्या परीक्षण अहवालानुसार काम करणार आहे. त्यासाठी सदर काम तातडीने करून  घेण्यात येणार आहे. 

महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम 5(2)(2)नुसार थेट पद्धतीने करारनामा न करता या क्षेत्रातील तज्ज्ञ कन्स्लटंट सी. व्ही. कांड कन्स्लटंट यांच्याकडून सदर सर्वेक्षण करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी 4 लाख 21 हजार रुपये व इतर कर, असा एकूण खर्च थेट पद्धतीने अदा केले जाणार आहे. या खर्चास मान्यता देण्याचा विषय येत्या स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. 

‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’चा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुलाची मजबुतीकरण व दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे पुलाचे आयुष्यमान वाढण्यास मदत होणार असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. 

त्याच पद्धतीने नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमचे ‘स्ट्रक्टरल ऑडिट’ केले गेले आहे. सदर स्टेडियमचे बांधकाम धोकादायक झाल्याने छताच्या स्लॅबचे बांधकाम पडून गज उघडे पडले आहेत; तसेच काही बांधकाम कमकुवत झाले आहे, तरीही या स्टेडियममध्ये महापालिकेचा क्रीडा विभाग, व्यायामाशाळा, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी कार्यालय, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघ; तसेच इतर कामकाज सुरू आहे. सदर स्टेडिमयचे मजबुतीकरण व दुरुस्ती करणे किंवा स्टेडियम पाडून नव्याने बांधण्याबाबत महापालिका विचार करीत आहे.