Thu, Jun 20, 2019 21:41होमपेज › Pune › ’भारतीय प्रतिभा’ हेच देशाचे भविष्य : डॉ. रघुनाथ माशेलकर 

’भारतीय प्रतिभा’ हेच देशाचे भविष्य : डॉ. रघुनाथ माशेलकर 

Published On: Jan 22 2018 1:23AM | Last Updated: Jan 21 2018 11:53PMपुणे ः प्रतिनिधी 

देशातील तरुणांना बदलत्या जगात यशस्वी होण्यासाठी अल्पसंतुष्ट न राहता मोठी ध्येय ठेवून काम करायला हवे. आतापर्यंत आयटी म्हणजे इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी हे भारताचे भविष्य असे म्हंटले जात होते. पण मला वाटते आयटी म्हणजे इंडियन टॅलेंट अर्थात भारतीय प्रतिभा हेच आपले भविष्य असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 112 व्या पदवी प्रदान समारंभात ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. अरविद शाळीग्राम, मुख्य परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण, प्रभारी वित्त व लेखा अधिकारी डॉ. विद्या गारगोटे, डॉ. दीपक माने, डॉ. विजय खरे, डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे उपस्थित होते. 

यावेळी डॉ. माशेलकर यांनी स्नातकांना यशस्वी होण्यासाठी दहा सूत्रे सांगितली. तसेच भारतीय प्रतिभा हेच देशाचे भविष्य असून, त्याची उभारणी करताना शिक्षण, नाविन्याची निर्मिती आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे. भरपूर कष्ट, बडेजाव न माजवता शांतपणे काम करत राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला. भविष्यासाठी शिक्षणात विविध कौशल्यांचा समावेश होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी व्यक्त केले. 

यावेळी डॉ. करमळकर म्हणाले, स्मार्ट सिटी मिशनच्या सहकार्याने संपूर्ण विद्यापीठात सौरऊर्जा निर्मिती करण्याची यंत्रणा स्थापित करण्यात येणार आहे. या माध्यमातून तयार होणार्‍या सौर उर्जेचा वापर आवारात केला जाणार आहे. यावेळी कुलगुरुंनी विद्यापीठाच्या गेल्या काही महिन्यांतील महत्त्वाच्या कामगिरीची माहिती दिली.

विद्यापीठातर्फे 79 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी, 17,762 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी, 88 विद्यार्थ्यांना एम.फिल, 347 पीएचडी पदव्या वितरित करण्यात येत आहेत. 

58 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान 

विद्यापीठाद्वारे विविध शाखांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना 58 सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.  यावेळी ‘दी प्रेसिडेंट ऑफ इंडिया डॉ. शंकर दयाळ शर्मा सुवर्णपदक’ बारामती येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी दीपाली मांजरे हिला प्रदान करण्यात आले, तर ‘कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका’ योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दीपाली सोनवणे आणि तंजिला खलील शेख या विद्यार्थिनींना गौरवण्यात आले.