Thu, Nov 15, 2018 07:33



होमपेज › Pune › तब्बल ५५ वर्षांनंतर पुण्यात अधिवेशन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात यंदा ‘इंडियन हिस्टरी काँग्रेस’

Published On: Jun 24 2018 1:35AM | Last Updated: Jun 24 2018 12:27AM



पुणे : प्रतिनिधी 

इतिहासकारांची अतिशय प्रतिष्ठेची असलेली ‘इंडियन हिस्टरी काँग्रेस’ ही परिषद यंदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 28 ते 30 डिसेंबर दरम्यान होणार आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात स्थापन झालेली ‘इंडियन हिस्टरी काँग्रेस’ ही शैक्षणिक आणि व्यावसायिक इतिहास अभ्यासकांची संस्था आहे. पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाने 1935 मध्ये या संस्थेची स्थापना केली होती. सन 1963 मध्ये डेक्कन कॉलेजमध्ये या संस्थेच्या परिषदेचे आयोजन केले गेले होते. यानंतर 55 वर्षांनंतर ही परिषद पुण्यात होत आहे. इंडियन हिस्टरी काँग्रेस ही आधुनिक भारतीय इतिहासाच्या दृष्टिकोनामधून अत्यंत महत्त्वपूर्ण संस्था आहे. 1935 मध्ये तत्कालीन ’निझाम हाऊस’मध्ये स्थापन झालेल्या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट भारताच्या इतिहासाचे सखोल संशोधन करणे हे होते. संपूर्णतः लोकशाही तत्त्वांवर चालविण्यात येत असलेल्या या संस्थेच्या परिषदेमध्ये कोणत्याही व्यावसायिक इतिहासकारास वा अध्यापकास संशोधन मांडण्याची पूर्णतः मुभा आहे. 

विद्यापीठाच्या इतिहास विभागाची स्थापना सन 1969 मध्ये करण्यात आली आहे. विभागाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या संस्थेची राष्ट्रीय पातळीवरील परिषद विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे.  या परिषदेमध्ये इतिहास क्षेत्रासंदर्भातील विविध विषयांवर सामान्यतः 15 समांतर सत्रे होतात व यांमध्ये साधारणतः 800 पेपर’ मांडण्यात येत असल्याची माहिती  इतिहास विभागाच्या प्रमुख डाँ. राधिका सेशन यांनी दिली.

इंडियन हिस्टरी काँग्रेस आणि विद्यापीठाचे अनोखे नाते.. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इंडियन हिस्टरी कॉग्रेस यांचे अनोखे नाते आहे. विद्यापीठाची स्थापना 1948 मध्ये करण्यात आली. तत्कालीन ’युनिव्हर्सिटी ऑफ पुना’चे पहिले कार्यालय भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमधील ‘निझाम गेस्ट हाऊस’ येथे स्थापन करण्यात आले होते. इंडियन हिस्टरी काँग्रेसची स्थापनाही याच निझाम गेस्ट हाऊसमध्ये झाली आहे. यानंतर 1949 मध्ये विद्यापीठाचे कार्यालय गव्हर्नर हाऊसमध्ये हलविण्यात आले.