Thu, Jan 17, 2019 13:05होमपेज › Pune › इराणने मानवाधिकार नाकारला; ग्रॅण्डमास्टर सौम्याची स्पर्धेतून माघार

इराणच्या बुरख्यावर भारतीय सौम्याचा कठोर निर्णय

Published On: Jun 13 2018 10:41AM | Last Updated: Jun 14 2018 1:35AMपुणे  : पुढारी ऑनलाईन

महिला ग्रॅण्डमास्टर आणि माजी जुनिअर गर्ल्स चॅम्पियन सौम्या स्वामीनाथन हिने २६ जुलैपासून इराण येथे होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत भाग घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. इस्लामिक देश इराणमध्ये हिजाब किंवा स्कार्फ घालणे बंधनकारक आहे. यामुळे आपल्या वैयक्तिक अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे सौम्याने म्हटले आहे.

सौम्या भारतातील आघाडीच्या ५ महिला बुद्धीबळपट्टूपैकी एक आहे. सौम्याने फेसबुकवर म्हटले आहे की, मी जबरदस्तीने स्कार्फ, हिजाब किंवा बुरखा घालणार नाही. इराणने कायद्याअंतर्गत जबरदस्तीने स्कार्फ घालायला लावणे हे मानवी हक्क आणि अधिकार नाकारण्यासारखे आहे. माझे स्वातंत्र्य, अभिव्यक्ती, विवेक आणि विचारांवर बंधन घालण्याचा हा प्रकार असून अशा परिस्थितीत मी इराणला जाणार नाही असे तिने सांगितले आहे.

भारताच्या संघात निवड होणे आणि प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणे हा एक गौरव आहे. पण मला दु:ख होत आहे की अशा महत्वाच्या स्पर्धेत सहभागी होता येत नाही. खेळाडू आपल्या जीवनात खेळाला प्राधान्य देतो त्यासाठी वाट्टेल तो त्याग करतो पण काही गोष्टी अशा असतात ज्यात तडजोड करता येत नाही असेही सौम्याने म्हटले आहे.