Sun, Mar 24, 2019 17:02होमपेज › Pune › स्वतंत्र पोलिस आयुक्तालय लवकरच

स्वतंत्र पोलिस आयुक्तालय लवकरच

Published On: Jan 13 2018 1:14AM | Last Updated: Jan 13 2018 12:57AM

बुकमार्क करा
पिंपरी :

गेली अनेक वर्षांपासून नुसतीच चर्चा, प्रस्ताव सुरू असलेले पिंपरी-चिंचवड आयुक्तालय लवकरच सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबई येथे झालेल्या बैठकीत प्रशासकीय बाबींची पूर्णपणे पूर्तता झाली असल्याची खात्रीशीर माहिती विश्‍वासनीय सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे आयुक्तालयासाठी लागणार्‍या पोलिस दलाबाबतही चर्चा आणि उपाययोजना सुरू करण्याचे सांगितले आहे. त्यामुळे लवकरच स्वतंत्र पोलिस आयुक्तालय सुरू होईल, अशीच चर्चा सध्या पोलिस वर्तुळात आहे.

शहरात आणि ग्रामीण परिसरात भरदिवसा खून, हातात नंग्या तलवारी, कोयते घेऊन सपासप वार करून समोरच्याला संपवून परिसरात दहशत माजवणे, वाहनांची तोडफोड करणे, किरकोळ कारणावरून राडा, वादविवाद, धारदार हत्याराने वार करून आयुष्यभरासाठी अपंगत्व आणणे, महिलांची छेडछाड, आयटी अभियंता तरुण-तरुणींचे खून, लुटमार, टोळी युद्ध, गोळीबार, त्यासाठी दोन टोळ्यांमधील राडा, दरोडा, वाहनचालकांना लुटणे, महिलांच्या, फसवणूक, यांसारख्या घटना राजरोसपणे घडत आहेत. यासोबतच पिंपरी-चिंचवड परिसरात गुन्हेगार, दहशतवादी, नक्षलवादी यांचे वास्तव झाले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड हे गुन्हेगारांचे महत्त्वाचे केंद्र बनत आहे.

शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पटीने गुन्हेगारी वाढत आहे. या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास पोलिस यंत्रणा कमी पडत आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या देहूरोड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, चाकण याही परिसरात गुन्हेगारी वाढलेली आहे. त्यामुळे स्वतंत्र आयुक्तालयाची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र आयुक्तालयाची मागणी होत आहे. यावर अधिवेशनात चर्चा झाली.

पोलिसांनी प्रस्ताव तयार करून ते गृह खात्याकडे पाठवले. त्यानंतर ते प्रस्ताव वित्त आयोगाकडे पाठवण्यात आले. तेथून ते प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आलेले आहेत. या सर्व घडमोडी झाल्यानंतर 10 जानेवारी रोजी मुंबईत एक बैठक झाली. या वैठकीत झालेल्या चर्चेवरून आणि सुरू असलेल्या हालचालीवरून लवकरच स्वतंत्र आयुक्तालय सुरू होण्याची चिन्हे आहेत. नवनगर विकास प्राधिकरणच्या जुन्या इमारतीमध्ये किंवा नव्या प्रशस्त इमारतीमध्ये दोन मजले नव्याने स्वतंत्र पोलिस आयुक्तालयासाठी मिळू शकतात. 

अशी असेल हद्द...

स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पुणे शहर पोलिसांच्या झोन तीनमधील पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, एमआयडीसी भोसरी, सांगवी, हिंजवडी, वाकड, तर झोन चारमधील दिघी पोलिस ठाणे; तसेच ग्रामीणच्या हद्दीतील चाकण, आळंदी, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, देहूरोड या पोलिस ठाण्याच्या समावेश होणार आहे. यामध्ये निगडी ठाणे आणि एमआयडीसी ठाण्यातील काही भाग कमी करून तयार होणार्‍या चिखली पोलिस ठाण्याचाही समावेश होणार आहे.