Sat, May 30, 2020 05:49होमपेज › Pune › नव्या मद्य परवान्यांसाठी पिंपरीत वाढती मागणी

नव्या मद्य परवान्यांसाठी पिंपरीत वाढती मागणी

Published On: Dec 28 2017 1:28AM | Last Updated: Dec 28 2017 12:05AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

एक दिवस मद्य पिण्याच्या परवाना घेणार्‍यांमध्ये पिंपरीमध्ये वाढ होत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हे परवाने देण्यात येत आहेत. 31 डिसेंबर साजरा करणार्‍यांना पोलिसांचा ससेमिरा नको म्हणून एक दिवसाचा मद्य पिण्याचा परवाना काढणार्‍यांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पिंपरी-चिंचवडमध्ये आतापर्यंत सुमारे 80 हजार परवाने मद्य दुकानदारांकडे वितरित करण्यासाठी दिले आहेत.

चिंचवड आणि पिंपरी विभागासाठी पिंपरी येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातून मद्य पिण्यासाठीचा परवाना दिला जातो. हे परवाने एक वर्ष, सहा महिने किंवा एक दिवसासाठी दिले जातात. या वर्षी 80 हजार, तर गेल्या वर्षी हा आकडा 50 हजारांच्या घरात होता. त्यामुळे या वर्षी परवाने देण्यात वाढ झाली आहे. पिंपरीतील कार्यालयाने 31 डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर मद्य पिण्याच्या परवान्यांचे वाटप केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी एक दिवसाच्या परवान्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडे 30 हजार अर्ज अधिक आले आहेत. 

या वर्षी आतापर्यंत 60 हजार परवान्यांचे वितरण केले असून, आणखी 20 हजार परवाने देण्यात येणार आहेत. त्यात देशी आणि विदेशी मद्यासाठी दिलेल्या परवान्यांचा समावेश आहे. दोन्ही प्रकारच्या प्रत्येकी 40 हजार परवाने वाटप करण्यात आले आहेत. हे परवाने परवानाधारक मद्याच्या दुकानांतून वितरित करण्यात येतात.

31 डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर मद्याचा काळाबाजार होऊ नये यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने शहर आणि परिसरातील ढाबे, हॉटेलवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, काळाबाजार करणार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे. उत्पादन शुल्क विभागाने रात्रीच्या वेळी हॉटेलची तपासणी सुरू केली असून, 31 डिसेंबरला भरारी पथकाची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.