Sat, Jul 20, 2019 08:40होमपेज › Pune › मुक्काम पुणे... भय इथले संपत नाही!

मुक्काम पुणे... भय इथले संपत नाही!

Published On: Jan 18 2018 1:46AM | Last Updated: Jan 18 2018 1:31AM

बुकमार्क करा
पुणे : अक्षय फाटक

शांत अन् सुसंस्कृत...निर्धास्त, भयमुक्त वातावरण आणि सांस्कृतिक राजधानी... ही पुण्याची ओळख... पण, आता स्वत:च्या संरक्षणासाठी पुणेकरांना पिस्तुलांची गरज भासते आहे. कारण, कायदेशीररीत्या पिस्तूल घेण्याचे प्रमाण नागरिकांमध्ये वाढत आहे.  दोन वर्षात साडेतीनशे पुणेकरांनी पिस्तुलासाठी पोलिसांकडे धाव घेतली. त्यामुळेच पुणेकर आता भयभीत जीवन जगत आहेत, असे म्हणण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, दोन वर्षांत दीडशे पिस्तुले बाळगण्यास परवानगीही दिली गेली. 

पुण्याची ‘आयटी हब’ ते ‘स्मार्ट सिटी’ अशी ओळख झाली. सुखसुविधांनी या शहराने भरभराट केली. ‘पुणे तेथे काय उणे’ या उक्तीनुसार शहरात सर्व सुविधा उपलब्ध झाल्या. शहराने 60 लाखांच्या जवळपास लोकसंख्येचा आकडा पार केला. लोकसंख्या वाढली की, पोलिसांचा वचक न राहिल्यास ही गुन्हेगारीही वाढते हे एक सत्य आहे. एकीकडे शहर सुविधांकडे वाटचाल करत असताना दुसरीकडे गुन्हेगारीने शिरकाव केला. अल्पावधीतच टोळ्यांपर्यंत मजल मारली.

टोळ्यांच्या वर्चस्व वादातून एकमेकांचे मुडदे पाडले. या टोळ्यांचा उदय मुळात पैसा आणि भाईगिरीसाठी झाला. बिल्डरांकडून खंडणी उकळणे, जागांचे ताबे घेणे यापासून व्यवहार मिटविणे आदी या टोळ्यांचे प्रमुख उद्योग बनले. धमक्यांपासून मारहाण-अपहरण आणि खून होऊ लागले. गोळीबाराच्या घटनांनी शहर अधून-मधून हादरते. दिवसाढवळ्या लूटमार सुरू झाली. किरकोळ घटनांमध्येही चोरट्यांकडून पिस्तुलांचा वापर होत असल्याचे दिसत आहे.  

शहरात बेकायदेशीर पिस्तुलांचा सुळसुळाट आहेच. सराईत गुन्हेगार सर्रास पिस्तूल बाळगत असल्याचे दिसत आहे. पिस्तूल असणे हे एक ‘स्टेटस’ झाले आहे. शहरात दरवर्षी शंभरावर पिस्तुले आणि काडतुसे जप्त करण्यात येतात. त्यामुळे मोकाट सुटलेल्या गुन्हेगारांचे शहर अशीही एक पुण्याची ओळख बनू पाहत आहे. राजकारणी-व्यावसायिक तसेच, पोलिसही खासगी पिस्तूल घेण्यासाठी सरसावत असल्याचे चित्र आहे.