Wed, Feb 20, 2019 08:40होमपेज › Pune › जिल्ह्यातील कुपोषितांची संख्या वाढतेय

जिल्ह्यातील कुपोषितांची संख्या वाढतेय

Published On: Mar 06 2018 2:02AM | Last Updated: Mar 06 2018 1:38AMपुणे : प्रतिनिधी

राज्यामध्ये कुपोषित आणि तीव्र कुपोषित मुलांची संख्या जास्त आहे. सरकारच्या पोषण पुनर्वसन केंद्र आणि एकात्मिक बालविकास योजना या दोन योजनांमध्येच मोठी तफावत असल्याचे ‘स्वाधार’ने केलेल्या अभ्यासात आढळून आले असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा अंजली बापट, प्रिया कुलकर्णी आणि सरिता भट यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

‘स्वाधार’ आणि कर्वे समाज संस्था यांच्या संयुक्‍त विद्यमाने बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर परिसरात लहान मुले आणि पालकांबरोबर त्यांच्या बौद्धिक, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासाबाबत प्रकल्प राबविण्यात आला होता. अप्पर इंदिरानगर येथे 15 हजार लोकसंख्या असून, परिसरातील 0 ते 6 वयोगटातील आर्थिकद‍ृष्ट्या वंचित गटातील एकूण 666 मुले सुरुवातीला या अभ्यासात सहभागी झाली होती. त्यापैकी 566 मुलांचा प्रत्यक्षात अभ्यास करण्यात आला. 

या अभ्यासात 49 टक्के मुले; तर 51 टक्के मुलींचे प्रमाण आहे. 11 टक्के मुलांच्या माता पूर्णपणे अशिक्षित आहेत. या मुलांमध्ये 1.5 टक्के मुलेच अतितीव्र कुपोषित; तर 23.4 टक्के मुले मध्यम कुपोषित आढळून आली. 35.4 टक्के मुले बुटकेपणा, 7.8 टक्के मुले ही लुकडेपणा तर 17.4 टक्के मुले ही कमी वजनाची आढळून आलेली आहेत.
शासनाच्या दोन योजना सध्या कार्यान्वित आहेत. पोषण पुनर्वसन केंद्रामध्ये तीव्र कुपोषित मुलांवर म्हणजेच तीव्र लुकडेपणा असणार्‍या मुलांवरच उपचार केले जातात. एकात्मिक बालविकास योजनेमध्ये कमी वजनाच्या मुलांवर जास्त काम केले जाते; त्यामुळे एकात्मिक बालविकास योजनेकडून तीव्र कमी वजनाची मुले पोषण पुनर्वसन केंद्रात पाठवली जाण्याची शक्यता कमी असते; त्यामुळे या दोन योजनांमधील तफावत शासनाने कमी करून एकात्मिक बालविकास योजनेला तीव्र लुकड्या मुलांसोबत काम करण्याचे प्रशिक्षण देणे उपयुक्‍त ठरणार असल्याचे भट यांनी या वेळी सांगितले.