Thu, Jul 18, 2019 04:45होमपेज › Pune › कुमारी मातांची संख्या वाढतेय

कुमारी मातांची संख्या वाढतेय

Published On: Jan 15 2018 7:25AM | Last Updated: Jan 15 2018 1:52AM

बुकमार्क करा
  पुणे : ज्ञानेश्‍वर भोंडे

शहराच्या मध्यवस्तीतील मध्यवर्गीय कुटुंबातील नववीत शिकणारी ‘ती.’ तिला गेल्या चार महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही म्हणून तिचे आईवडील तिला आठ दिवसांपूर्वी घेऊन ससून रुग्णालयात आले. रुग्णालयातील स्त्रीरोग विभागातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ‘ती’ चार महिन्यांची गर्भवती असल्याचे आढळले. हे ऐकून तिच्या घरच्यांच्या पायाखालची मातीच सरकली. पुढे तिला गर्भवती करणार्‍या तरुणावर ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर त्या मुलीचा गर्भपात करण्यात आला.  

ससून रुग्णालयात महिन्याला अशा किमान सात कुमारी माता येत असून, त्यापैकी 50 टक्के  मुली या 18 वर्षांच्या आतील असतात. असे होऊ नये यासाठी मुला-मुलींच्या पालकांनी जागरुक राहणे आवश्यक आहे. त्यांना लैंगिक शिक्षण देणे गरजेचे आहे. अशा प्रकरणात पोलिस केस होऊन मुलांचे शिक्षण, करियर आणि पर्यायाने जीवनच बरबाद होत आहे. 

अल्पवयीन मुलगी (18 वर्षांच्या आतील) गर्भवती राहिल्यास त्यास जबाबदार असणार्‍या संबंधित मुलावर ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होतो. या प्रकरणात पीडित मुलीची किंवा तिच्या घरच्यांचीही संबंधित मुलाविरुद्ध काही तक्रार नसली तरी कायद्याने ती तक्रार करणे बंधनकारक आहे. कारण ती सज्ञान नसते. हे सोपस्कार पार पाडल्यानंतरच पीडित मुलीचा गर्भपात करण्यात येतो. या सर्व बाबी त्या मुलीला आणि नातेवाइकांना सामाजिकदृष्ट्या अडचणी येऊ नये म्हणून गुपित ठेवल्या जातात. मात्र, सज्ञान मुलगी (18 वर्षांपेक्षा जास्त)  गर्भवती राहिली व तिचा गर्भपात करावयाचा ठरल्यास तिचे मत विचारात घेतले जाते. 

यामध्ये तिला गर्भवती करणार्‍या संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करायचा की नाही हे तिच्या; तसेच तिच्या घरच्यांच्या मनावर असते. यानंतर या मुलीचाही गर्भपात करण्यात येतो.

अनेक घटक कारणीभूत
   हे प्रकार होण्यास एकापेक्षा अनेक घटक कारणीभूत ठरतात. सामाजिक, माध्यमांचा परिणाम, सांस्कृतिक, लैंगिक शिक्षणाचा अभाव आदी घटक महत्त्वपूर्ण आहेत. आठ दिवसांपूर्वी ससूनमध्ये आलेल्या 14 वर्षीय मुलीच्या प्रकरणात तिच्याजवळीलच मुलगा कार घेऊन तिला शाळेत घेऊन जात असे आणि परत आणत असे. तसेच घराशेजारील बोळात कार लावल्यानंतर तिच्याशी लैंगिक संबंध ठेवत असल्याचे नंतर उघडकीस आले आहे. यामध्ये त्या मुलाने घराशेजारी कार लावणे, कारमध्ये घेऊन जाणे, कारमध्ये संबंध ठेवण्याइतपत त्याची हिंमत वाढणे यासारखी कित्येक कारणे असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. 

ग्रामीण भागातीलही मुली
पण अशा प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा प्रकरणातील ऑक्टोबर 2016 ते सप्टेंबर 2017 दरम्यान एकूण 90 कुमारी मातांची नोंद करण्यात आली. त्यापैकी जवळपास 50 टक्के  मुली या 18 वर्षाच्या आतील होत्या. म्हणजेच महिन्याला शहरातून तसेच ग्रामीण भागातून किमान 7 कुमारी माता ससूनमध्ये दाखल होत आहेत. यातील बहुतांश मुलींचे पालक हे मुलीला तिसर्‍या किंवा चौथ्या महिन्यात पाळी न आल्यामुळे घेऊन येतात. त्याचप्रमाणे पोलिसांद्वारे या केसेस येतात. यामध्ये गरीबच नव्हे तर मध्यमवर्गीय आणि श्रीमंतांमधील केसेसही दाखल होतात. एक तर क्लास वन अधिकार्‍याच्या मुलीबाबत हा प्रकार घडलेला आहे.

 पालकांनो, मुलांवर लक्ष ठेवा...
 अल्पवयीन कुमारी माता प्रकरणांत मुलींपेक्षा मुलांचे आयुष्य अधिक बरबाद होते. कारण पोलिस केस झाल्यानंतर मुलीचा गर्भपात होतो आणि तिची सुटका होते. पण, पुढे त्या गुन्ह्यातील मुलावर ‘पॉक्सोेेेेे’ गुन्हा दाखल होऊन त्याला किमान सात वर्षांची सजा लागते. यामध्ये त्याचे शिक्षण, करियर हा महत्त्वाचा वेळ बरबाद होतो. एकंदरीत तो आयुष्यातूनच उठतो. म्हणून मुलांच्या पालकांनी मुलगा अल्पवयीन मुलीसोबत फिरतो का, काही नाते आहे का याबाबत लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करतात.

असुरक्षित संबंधांमुळे आजारांची लागण
 असुरक्षित संबंध केल्यामुळे एचआयव्ही, गुप्त रोग, वंध्यत्व या समस्या उद्भवू शकतात. त्यासाठी वयात येणार्‍या मुला-मुलींना पालकांनी लैंगिक शिक्षण देणे आवशक आहे. असुरक्षित संबंधांचे काय परिणाम होतात हे समजावून सांगणे महत्त्वाचे आहे. 


- डॉ. रमेश भोसले, स्त्री-रोग व प्रसूतीरोग विभागप्रमुख, ससून रुग्णालय