Fri, May 24, 2019 02:34होमपेज › Pune › प्रेमी युगुलांना ब्लॅकमेल करण्याच्या प्रकारांत वाढ

प्रेमी युगुलांना ब्लॅकमेल करण्याच्या प्रकारांत वाढ

Published On: May 19 2018 1:42AM | Last Updated: May 19 2018 1:37AMपुणे : प्रतिनिधी

लोणावळा, खंडाळा या पर्यटन स्थळावरील ‘लव्हर्स पॉईंट’वर फिरण्यासाठी येणार्‍या प्रेमी युगुलांना ब्लॅकमेल करून लूटमार करून लाखोंची हेराफेरी करण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. पण ही लूटमार चोर लफंगे नाही तर झीरो पोलिसांच्या साथीने होत आहे. इभ्रत जाऊ नये म्हणून लफडेबाज जोडपीही स्वतःला लुटून घेत आहेत.

लोणावळा-खंडाळा परिसर राज्यातील पर्यटकांना कुतूहलाचा विषय ठरलेला आहे. विशेत: मुंबईतील श्रीमंत पर्यटक शनिवार, रविवारी येथे प्रचंड संख्येने येथे येतात. या पर्यटन स्थळी प्रेमी युगुलांचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘लायन्स पॉईंट’. सहारा सिटीजवळ असलेल्या या ठिकाणी प्रेमी युगुलांची झुंबड उडते. येथे सगळा धिंगाणा चालत असतो. पण, हा धिंगाणाच झीरो पोलिस आणि खाकीसाठी लाखोंची कमाई देणारा ठरला आहे.

या ‘लव्हर्स पॉईंट’वर येणारी प्रेमी युगूल श्रीमंत असतात. या पॉईंटवर आल्यावर ही तरूणाई दारू, बियर सर्रास पीत असतात. त्यामुळे झीरो पोलिस आणि खाकीसाठी ही जोडपी हमखास बकरे ठरतात. या पॉईंटवर रात्री उशिरापर्यंत चाळे करत असलेल्या जोडप्यांना कारवाईची धमकी देऊन पंधरा हजार रुपयांची सर्रासपणे तोडपाणी केली जाते. ही तोडपाणी करण्यासाठी खास कर्मचारी नेमण्यात येतात.

येथे वर्णी लागावी म्हणून ‘खास बोली’ लावली जाते. महिना ठराविक रक्कम बोलीत देणार्‍यानाच येथे ड्युटी दिली जाते. या लूटमारीबद्दल वरिष्ठांकडे तक्रारी ही केल्या गेल्या आहेत. मात चौकशी करणार्‍या वरिष्ठांचेच हात ओले होत असल्याने लूटमार खुलेआम चालूच आहे. विशेष म्हणजे एक तारखेला जिल्हा पोलिस अधीक्षक बदलून जाणार, याचीच चर्चा जोरदार सुरू असल्याने तर ही लूटमार करणारी टोळी बेफाम हेराफेरी करीत आहे.