Sat, Apr 20, 2019 23:52होमपेज › Pune › वाढत्या ताण-तणावाने पोलिस समस्यांच्या घेर्‍यात

वाढत्या ताण-तणावाने पोलिस समस्यांच्या घेर्‍यात

Published On: Jun 17 2018 1:37AM | Last Updated: Jun 17 2018 1:00AMपुणे : पुष्कराज दांडेकर 

शहरात कायदा व सुव्यवस्थेची महत्त्वाची जबाबदाऱी असलेल्या पुणे शहर पोलिस दलातील पोलिसांवर तुटपुंजा पगार, अपुरे मनुष्यबळ, बंदोबस्त, कामाचे जादा तास यामुळे प्रचंड तणाव वाढला आहे. या तणावामुळे पोलिस दलातील अनेक कर्मचार्‍यांना अनेक आरोग्याच्या समस्यांनी ग्रासले आहे.  त्यामुळे  खाकी वर्दीची वाताहत होत असल्याचे चित्र सध्या  आहे. 

पुणे शहराची लोकसंख्या 35 ते 40 लाखांच्या घरात गेली आहे. पुणे शहर पोलिस दलात एकूण 11 हजार 144  पोलिस अधिकारी व  कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे आपोआपच एवढ्या मोठ्या लोकसंखेचा भार पुण्यातील पोलिसांवर येतो. तसेच सांस्कृतिक शहरातील कार्यक्रम, राजकिय नेत्यांचा बंदोबस्त, पोलिस ठाण्यातील कामकाज अशा सर्व गोष्टी पोलिसांचे कामाचे तास आणि तणाव वाढविणार्‍या ठरल्या आहेत. याचा थेट परिणाम पोलिसांचे आरोग्य आणि त्यांच्या कामावर होत आहे. 

वर्षातील अनेक दिवस बंदोबस्तच वाट्याला 

पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना विशेष महत्त्व आहे. तसेच राजकियदृष्ट्या महत्त्वाच्या शहरात पोलिसांचे वर्षातील अनेक दिवस केवळ बंदोबस्त करण्यात जात आहेत. गणेशोत्सवावेळी तर पोलिसांनी 36 ते 48 तास सलग बंदोबस्तासाठी तैनात राहावे लागते. त्यासोबतच शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील डेक्कन, विश्रामबाग, फरासखाना, बंडगार्डन, समर्थ पोलिस कर्मचार्‍यांना  वर्षभर बंदोबस्ताचीच ड्युटी करावी लागते. 

ड्यूटी 8 तास नाहीच 

मुंबई पोलिस दलातील कर्मचार्‍यांची ड्युटी 8 तास करण्यात आली आहे. मात्र, मुंबई वगळता पुणे आणि तत्सम मोठ्या शहरांत तसेच राज्यात पोलिसांची ड्युटी 12 तास किंवा त्यापेक्षाही जास्त असते. त्यातही 12 तास संपल्यानंतरही घरी जाता येईल का याची शाश्‍वती नाही.  पोलिसांची ड्यूटी 8 तासांची करावी अशी मागणी पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र राज्य शासनाकडून त्याची गंभीर दखल घेतली जात नाही. 

आरोग्यावर परिणाम 

पोलिसांना गुन्हे दाखल करणे व तपास करणे यासोबतच  कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासोबतच सण- उत्सवांतील बंदोबस्त, निवडणूक कामाचा बंदोबस्त यासह इतर कामेही करावी लागत आहेत. यावेळी जेवण, झोप नसल्याने लठ्ठपणा येतो. पोलिसांची ढेरपोट्या अशी प्रतिमा यामुळेच झाली आहे. याचा परिणाम म्हणजे उच्चरक्तदाब, मधुमेह या आजारांनी त्यांना ग्रासले आहे. त्यासोबतच कामाचा ताण, घरगुती अडचणी, अपुरी झोप आणि इतर अनेक कारणांनी त्यांच्यामध्ये मानसिक आजारांचेही प्रमाण वाढले आहे. यासाठी पोलिस रुग्णालये त्यांची काळजी घेण्यासाठी आहेत. मात्र त्यांचा फारसा उपयोग होत नाही.तर वेळोवेळी सेवाभावी संस्था त्यांच्यासाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करतात; मात्र त्यांचाही फारसा उपयोग होत नाही. 

राज्यात 42 हजार गुन्हे प्रलंबित 

राज्यातील पोलिस ठाण्यांमध्ये तब्बल 42 हजार 869 गुन्हे तपासाअभावी रखडले आहेत. पोलिसांना गुन्हे दाखल करण्याशिवाय बंदोबस्त आणि इतर कामे करावी लागतात. त्यामुळे या तपासांशिवाय असलेला ताण याचा थेट परिणाम गुन्हे निकाली काढण्यावर होतो. अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. 

आर्थिक घुसमट 

शहराची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था अशी मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे. मात्र पोलिसांना इतर खात्यांतील कर्मचार्‍यांच्या तुलनेत अगदी तुटपुंज्या पगारावर काम करावे लागते. पुण्यासारख्या शहरात  पोलिसांना राहण्यासाठी तुटपुंजी घरे आहेत. त्यांना भाड्याने घर घेऊन राहावे लागते. पुण्यातील घरांचे भाडे या पगारात परवडणारे नाही. त्यातच मुलांचे शिक्षण, इतर कौटुंबिक जबाबदार्‍या यासाठी लागणारी आर्थिक रसद पुरी होत नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक घुसमट होते आहे.