Wed, Jul 24, 2019 02:05होमपेज › Pune › युवकवर्गात हृदयविकाराचे वाढते प्रमाण

युवकवर्गात हृदयविकाराचे वाढते प्रमाण

Published On: May 09 2018 1:50AM | Last Updated: May 09 2018 1:31AMपुणे  प्रतिनिधी

छातीत दुखत असल्याच्या कारणावरून विशीतल्या तरुणांना  रुग्णालयांत उपचारार्थ दाखल करण्याचे व त्यातही या तरुणांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान होत असल्याचे अनेक उदाहरणे समोर येत आहेत. ऐन तारुण्यात हृदयविकाराचा धोका का वाढतो आहे, याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता, आनुवंशिक व बदलत्या जीवनशैलीने तरुणात हृदयविकाराचा धोका वाढत असल्याचे मत हृदयरोग तज्ज्ञांनी व्यक्त केले. वेळीच काळजी घेतल्यास धोका टाळला जाऊ शकतो असा दिलासाही त्यांनी दिला.   तरुण वयात ज्यांना हृदयविकार होतो त्याचे कारण आनुवंशिकता आणि बदललेली जीवनशैली हे आहे. म्हणून ज्यांच्या घरी किंवा जवळच्या नात्यामधील व्यक्‍तींना हृदयविकाराचा धक्‍का येऊन गेला आहे, त्यांनी पंचविशीतच चाचण्या करून घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उच्च शिक्षण घेणार्‍या ॠषिकेश आहेर (25, रा. संगमनेर, अहमदनगर) याचा सोमवारी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. यावरून हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हृदयविकार विशी ते पंचविशीमध्ये येऊन ठेपला आहे का, अशी भीती व्यक्त होत आहे.

ज्यांच्या घरामध्ये आई-वडील, आजोबा, काका, मामा या जवळच्या नातेवाईकांना 50 ते 55 वर्षे वयाच्या अगोदरच हृदयविकाराचा धक्‍का आलेला आहे, त्या कुटुंबातील तरुणांनी काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच ज्यांची जीवनशैली अनियमित जसे उशिरा झोपणे- उठणे, अवेळी जेवण करणे, व्यायाम न करणे, धूम्रपान, व्यसन, कामाचा ताण अशी  आहे, त्यांना हृदयविकाराचा धोका असल्याची माहिती आरएमडी हॉस्पिटलचे संचालक व हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रणजित जगताप यांनी दिली. तर आनुवंशिकतेमुळे आणि व्यायाम न केल्याने जवळपास 99 टक्क्यांपर्यंत तरुणांमध्ये हृदयरोगाचा धोका असल्याचे गेल्या पंधरा वर्षांत दिसून येत आहे, असे निरीक्षण पूना हॉस्पिटलचे हृदयरोग व भूलतज्ज्ञ डॉ. अजित गायकवाड यांनी नोंदवले. ज्यांच्या कुटुंबामध्ये मोठ्या व्यक्‍तींना तसेच जवळच्या नातेवाईकांना हृदयविकाराचा धक्‍का आला आहे, त्यांनी विशी ते पंचविशीमध्येच हृदयरोगतज्ज्ञांना भेटून आवश्यक त्या चाचण्या करून घ्याव्यात. त्यामुळे पुढे असलेले धोके कमी होतील, असा सल्‍ला हृदयरोगतज्ज्ञ देतात. 

कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका-

कोलेस्ट्रॉलचे वाढलेले प्रमाण हे अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृृत्यू होण्यामध्ये एक प्रमुख कारण आहे. हृदयाला रक्‍तपुरवठा करणार्‍या रक्‍तवाहिनीमध्ये कोलेस्ट्रॉल साचते. त्याचे प्रमाण हे 50 ते 70 टक्के असते. त्यावेळी जर रक्‍ताची गुठळी तयार झाली व तेथे अडकली तर अचानक हृदय बंद पडून हृदयविकाराचा धक्‍का येतो, अशी माहिती जहांगिर हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्‍वर गवारे यांनी दिली.