होमपेज › Pune › दक्षिणेकडून मागणी वाढल्याने कांदा महागला

दक्षिणेकडून मागणी वाढल्याने कांदा महागला

Published On: Dec 08 2017 1:41AM | Last Updated: Dec 08 2017 1:27AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

दक्षिणेकडील राज्यांमधून कांद्याला मागणी वाढली असून मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने कांद्याच्या दरात प्रतिकिलोमागे 10 ते 15 रुपयांनी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत जुन्या कांद्याचा हंगाम संपला असून, मार्केटयार्डातील घाऊक बाजारात नवीन कांदा दाखल होत आहे. त्याच्या प्रतिदहा किलोस 300 ते 400 रुपये दर मिळत आहे. गुरुवारी बाजारात 125 ट्रक कांद्याची आवक झाली असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.  

सद्यस्थितीत राज्यातील कांद्याला दक्षिणेकडील कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ आदी राज्यांमधून मोठी मागणी होत आहे. कर्नाटक राज्यातील हळवी कांद्याचा हंगाम संपला आहे. तर तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशामध्ये यंदा मोठा पाऊस झाल्याने कांद्याच्या पिकाचे नुकसान झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. परिणामी, तामिळनाडू आणि केरळ राज्यांमधून उच्च प्रतीच्या तर कर्नाटकातून मध्यम मालाला मोठी मागणी होत आहे. यंदा राज्यात हळवी कांद्याचे उत्पादन कमी प्रमाणात झाले असून डिसेंबरपर्यंत हळवी कांद्याचा हंगाम सुरू राहील. दरवर्षीप्रमाणे मार्केटयार्डातील बाजारात कांद्याची अपेक्षित आवक होत आहे. मात्र, दक्षिणेकडील राज्यांमध्ये कांद्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याने कांद्याचे दर कडाडले आहेत. 

कांद्याच्या वाढलेल्या भावाबाबत बोलताना व्यापारी राजेंद्र कोरपे म्हणाले, गेल्या आठवड्यात कांद्याच्या दरात वाढ झाल्याने शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी बाजारात आणला होता. परिणामी मार्केटयार्डात कांद्याची तब्बल 225 ट्रक इतकी आवक झाली होती. त्यामध्ये कच्च्या आणि कोंब आलेल्या कांद्याचे प्रमाण सर्वाधिक राहिल्याने दरात प्रतिकिलोमागे 7 ते 8 रुपयांनी घट झाली होती. कांद्याच्या घसरत चाललेल्या दरामुळे शेतकर्‍यांनी कांद्याची काढणी थांबविली होती.  

दरम्यान, सोमवारपासून बाजारात मालाची आवक घटली तसेच कच्च्या कांद्याचे प्रमाण कमी झाल्याने दरात प्रतिदिन दोन ते तीन रुपयांनी वाढ झाली. गेल्या आठवड्यापासून कांद्याच्या दरात वाढ होत असल्याने शेतकर्‍यांनी पुन्हा कांदा बाजारात दाखल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दरात मोठी वाढ होऊन घाऊक बाजारात कांद्याच्या प्रतिकिलोस 30 ते 40 रुपये दर मिळत आहे. मात्र, किरकोळ बाजारात त्याची 50 ते 60 रुपये किलोने विक्री होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे.