Mon, Jul 22, 2019 01:07



होमपेज › Pune › देहूरोड परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक 

देहूरोड परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक 

Published On: Jan 19 2018 1:56AM | Last Updated: Jan 18 2018 11:36PM



देहूरोड ः उमेश ओव्हाळ

देहूरोड पोलीस हद्दीत चोर्‍या, हाणामार्‍या आणि दहशत माजविण्याच्या प्रकारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास प्रलंबीत असताना रोज त्यात नवीन गुन्ह्यांची भर पडत चालली आहे. एकंदरीतच परिस्थिती हाताबाहेर चालली असून नागरिकांमध्ये मात्र, असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक यांचा कडक शिस्तीचे अधिकारी असा लौकीक आहे. कामचुकार पोलीस किंवा अधिकार्‍यांवर त्यांचा प्रचंड धाक आहे, असेही मानले जाते. मात्र, देहूरोड परिसरात अलिकडच्या काळात सातत्याने घडणार्‍या काही घटना पाहता त्यांचा खरंच पोलीसांवर वचक आहे का? असा प्रश्‍न पडतो. देहूरोड पोलीस हद्दीत अवैध धंदे वरवर बंद असल्याचे दिसत असले तरी लपून छपून मोठ्या प्रमाणात असे धंदे सुरू आहेत.

शहरातील कुख्यात मटका किंगचे अनेक पंटर खिशात मटक्याची पुस्तके घेऊन रस्त्यावर फिरून, हॉटेलात बसून किंवा रेल्वेस्थानकावर मटका चालविताना दिसतात. पडद्याआडून चालणारा हा व्यवसाय अगदी शासकिय मान्यता मिळाल्याप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी राजरोसपणे सुरू आहे. याची माहिती असूनही पोलीसांची गुपचिळी पहायला मिळते.

मागील काही महिन्यात एम.बी. कॅम्प, श्रीनगर, शितळानगर, मुकाई चौक, आंबेडकर नगर थॉमस कॉलनी या परिसरात गुन्हेरगारीने अक्षरशः थैमान घातले आहे. हाणामार्‍या, वाहनांची तोडफोड, नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. विकासनगर येथे 31 डिसेंबरला किरकोळ कारणावरून तरूणाचा खून झाला. हि घटना ताजी असतानाच केवळ खुन्नसने पाहिल्याच्या कारणावरून एका व्यापार्‍याच्या डोक्यात दगड घालुन जखमी करण्यात आले. आंबेडकर नगर येथे अविनाश कांबळे या तरूणावर एकाच आठवड्यात दोनवेळा एकाच टोळक्याने हल्ला केला. या घटनांमुळे नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. गल्लीबोळातील भाईंचे स्तोम प्रबळ होत चालले आहे. 

शहरात स्वयंघोषीत दादा, भाऊ, भाई यांच्या वाढदिवसांनी कहर केला आहे. सगळे नियम पायदळी तुडवून हे वाढदिवस साजरे होताना दिसतात. कर्णकर्कश आवाजात डिजे वाजविणे, सार्वजनिक ठिकाणी स्टेज उभारून रस्ते अडविणे, पुणे, पिंपरी-चिंचवडमधील टोळक्यांना बोलावून आपला दरारा दाखविण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारांची स्पर्धा सुरू आहे. रस्त्यावरच दारूच्या बाटल्या रिकाम्या होताना दिसतात, पण पोलीसांकडून कारवाई होत नाही. अल्पवयीन गुन्हेगार सुभान शेख याचा खून अशाच एका वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर झाला होता. अशा कार्यक्रमांना पोलीस परवाने मिळतात कसे, हा खरा प्रश्‍न आहे. 

महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणे, चोर्‍या, घरफोड्यांचे प्रमाणही कमालीचे वाढले आहे. दिवसागनिक एकतरी घटना शहरात घडत असते. मागील काही आठवड्यात विकासनगर, टीसी कॉलनी, या परिसरात दागिने हिसकावण्याच्या चार घटना तर शहराच्या वेगवेगळ्या भागात घरफोडीच्या सहा घटना घडल्या आहेत. या सर्व घटना पाहता गेले पोलीस कुणीकडे, वाढलेत गुन्हे चोहिकडे असे म्हणण्याची वेळ आली आहे.