Tue, May 21, 2019 12:09होमपेज › Pune › सत्ताधारी भाजप-रिपाईत वाढतोय संघर्ष

सत्ताधारी भाजप-रिपाईत वाढतोय संघर्ष

Published On: Feb 15 2018 1:57AM | Last Updated: Feb 15 2018 12:58AMपुणे : पांडुरंग सांडभोर

केंद्रापासून थेट महापालिकेपर्यंत एकत्रित सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांच्यात शहराच्या पातळीवर कुरबुरी सुरू झाल्या आहेत. आगामी काळात या दोन सत्ताधारी पक्षातील संघर्ष अधिकच टोकाला जाण्याची शक्यता असून, विधानसभा निवडणूकीत त्याचा फटका भाजपला बसण्याची भिती व्यक्‍त केली जात आहे.  

लोकसभा आणि विधानसभा निवडणूका वर्षभरावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राजकिय वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे. मात्र, विरोधी पक्षांत शांततेचे वातावरण असतानाच सत्ताधारी पक्षात मात्र कुरबरी सुरू झाल्या आहेत. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. आत्ता हा संघर्ष टोकाला गेला असून, सेनेने थेट स्वबळावर निवडणूका लढण्याचा नारा दिला आहे. मात्र, त्यापाठोपाठ आता पुणे शहर पातळीवर भाजप-रिपाईत कुरबुरी सुरू झाल्याने भाजप श्रेष्ठींसमोरील अडचणी वाढल्या आहेत.

गेल्या काही दिवसातील घडामोडीं त्यास कारणीभूत ठरल्या आहेत. रिपाईचे नगरसेवक थेट भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत, मात्र, तरीही रिपाई आपले स्वतंत्र अस्तित्वत दाखविण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहे. त्यामुळे महापालिकेत या दोन्ही पक्षात संघर्ष निर्माण होऊ लागला आहे. सिंहगड रस्त्यावरील पालिकेच्या मालकीचा भुखंड मूळ मालकाला देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला, मात्र, त्यानंतर रिपाईने त्याविरोधात भुमिका घेतली. तसेच या ठरावाच्या विरोधात थेट फेरविचाराचा ठरावही रिपाईच्या नगरसेवकांनी दिला. त्यावरून उपमहापौर सिध्दार्थ धेंडे आणि सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्यात वादावादीही झाली. हा वाद थेट उपममहापौरांना आणखी एका प्रस्तावावरील मतदानाच्यावेळी सभागृहात अनुपस्थित राहल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजाविण्यापर्यंत गेला. त्याआधी या दोन्ही काही किरकोळ कारणांवरून आणि मानापानावरून खटके उडालेही होते. मात्र, ते थेट चव्हाट्यावर आले नव्हते.

या दोन्ही पक्षात दरी वाढण्यास आणखी एक घटना कारणीभूत ठरली आहे. ती म्हणजे कोरेगाव भीमा येथील हिसांचाराची घटना. यासगळ्या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यास सरकार टाळाटाळ करीत असल्याची भावना आंबेडकरी जनतेत आहे. त्यामुळे रिपाईची अडचण झाली आहे. कोरेगाव भिमा हिसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्यावर विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांचा जिल्हा आणि उच्च न्यायालयाने जामिन फेटाळूनही त्यांना अटक होऊ शकली नाही. राज्यातील सत्ताधारी भाजपकडून एकबोटेंवर कारवाईस टाळाटाळ केली जात असल्याची टिका होत आहे. सत्तेत असलेल्या रिपाईवर त्याचा रोष येऊ लागला आहे. त्यामुळे रिपाईने आता थेट आक्रमक भुमिका घेतली आहे. 

भिडे - एकबोटेंना पाठिशी घालणार्‍या राज्य सरकारच्या विरोधात रिपाईने आज गुरूवारी पुण्यात भव्य निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यामुळे रिपाईने आता थेट रस्त्यावर उतरून आवाज उठविला आहे. त्यामुळे या दोन पक्षातील मतभेद आता थेट संघर्षाच्या पातळीवर येऊन ठेपले आहेत. 

खरेतर आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून पक्षाचे अस्तित्व दाखवून देण्यासाठी किंबहुना ते टिकविण्यासाठी तसेच कोरेगाव भिमाप्रकरणी आंबेड्करी जनतेत असलेल्या नाराजीचा फायदा उठविण्यासाठीही  रिपाईने अशा पध्दतीची भुमिका घेतलेली असू शकते. मात्र, त्यामुळे सर्वसामान्यांपुढे तरी किमान या दोन पक्षात दरी निर्माण होत असल्याचे चित्र आहे, त्याचा फटका आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत थेट भाजपला बसण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

रिपाईच्या नेतेमंडळीनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत, उपमहापौर डॉ. धेंडे यांनी महापालिकेत तरी भाजप आम्हाला विश्‍वासात घेत असल्याचे सांगत आमच्यात मतभेद नसल्याचे स्पष्ट केले. तर रिपाईचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे यांनी आमचा भाजपसमवेतचा काँमन मिनीमम कार्यक्रम ठरलेला असल्याचे म्हटले आहे. ज्याठिकाणी भाजपकडून या कार्यक्रमाची अंमलबजावणी झाली नाही, त्याठिकाणी रिपाईने आक्रमक भुमिका घेतली असल्याचे स्पष्ट केले.