Sun, Feb 17, 2019 05:03होमपेज › Pune › किशोरवयीनांमध्ये वाढतेेय ‘भाई’गिरीची नशा!

किशोरवयीनांमध्ये वाढतेेय ‘भाई’गिरीची नशा!

Published On: Jun 13 2018 1:35AM | Last Updated: Jun 13 2018 12:00AMपुष्कराज दांडेकर 

पुणे ः परिसरात आपली दहशत असावी यासाठी, ‘खळखट्याक’ करणारी, हातात कोयते, तलवारी आणि हत्यारे घेऊन फिरणारी किशोरवयीनांची टोळकी, महागडी गॅजेट्स, वाहने यांचे आकर्षण, यामुळे गुन्हेगारी क्षेत्रात ओढली जाणारी मुले वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या प्रकारांमुळे पालक आणि पोलिसांची डोकेदुखी मात्र वाढली आहे. हे चित्र बदलायचे असेल तर वेळीच पोलिस आणि पालकांनी यात पुढाकार घेऊन मुलाचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. 

गल्ली बोळात असलेले ‘भाई’ मंडळींचे पोस्टर्स आणि त्यांचा परिसरात दरारा आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी वेळोवेळी तडीपारी, मोक्का, असे उपाय केले आहेत. परंतु, त्याचा फारसा फायदा होताना दिसत नाही. मुले ही अनुकरणप्रिय असतात. परिसरातील गुंडांनाच हिरो मानून, त्यांचे अनुकरण करतात. मावा आणून देणे, सिगारेट आणून देण्याच्या कामाने ही सुरूवात होते. मग त्यांचे अनुकरण करत, गल्लीबोळात राडा करण्यास ते धजावतात. 

गुन्हा दाखल होणे प्रतिष्ठेचे लक्षण

सध्या गुन्हा दाखल होणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात आहे. ज्याच्यावर जास्त गुन्हे, तो मोठा भाई अशी मुलांची धारणा बनली आहे. त्यामुळे बालपणीच दाखल झालेले गुन्हे, तो सज्ञान झाल्यावर पुन्हा गुन्हेगारी जगतात पाय रोवण्यास मदत करतात. 

महागड्या गॅजेट्सचे आकर्षण 

किशोरवयीन मुले महागडे मोबाईल, वाहन चोरी, रस्त्यात अडवून लुबाडणे, अशा गुन्ह्यांत नकळत ओढली जात आहेत.