Sun, Mar 24, 2019 17:02होमपेज › Pune › ब्लॉग: का वाढताहेत आत्महत्या ?

ब्लॉग: का वाढताहेत आत्महत्या ?

Published On: Jul 04 2018 2:18AM | Last Updated: Jul 04 2018 2:05PMबुराडी येथील सामूहिक आत्महत्येच्या घटनेने सबंध देशाला हादरवून सोडले आहे. मुळातच सध्याच्या काळात आत्महत्येच्या मार्गाने जीवन संपवणार्‍यांचे प्रमाण वाढत चालले आहे. सामान्यतः आढळणार्‍या कारणांमध्ये अतितणाव, नैराश्य, व्यसनाधिनता, कर्जबाजारीपणा, प्रेमभंग आणि याबरोबरीने अलीकडील काळात दिसून आलेले दुर्धर आजारपण यामुळे आत्महत्येचा विचार केला जातो. वाढत्या आत्महत्या, वाढती हिंसा यांचा विचार करता आपल्याकडे ताणतणावांचे, भावभावनांचे व्यवस्थापन कसे करायचे, याविषयीचे प्रशिक्षण देण्याची एक वेगळी व्यवस्था तयार करण्याची गरज आहे. 
जगभरात सध्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे हे आता आकडेवारीनिशी सिद्ध झाले आहे. प्रत्येक घटनेमध्ये आत्महत्येचे पाऊल उचलण्यामागची कारणे वेगवेगळी असतात. सामायिक गोष्ट असते ती एकच, जगणे असह्य झाले आहे! आत्महत्या करणारी व्यक्‍ती आपला जीवनप्रवास संपवून निघून जात असली तरी कायद्याचे राज्य असणार्‍या आपल्या व्यवस्थेत त्या आत्महत्येमागचे कारण शोधले जाते. बहुतेक घटनांमध्ये ‘सुसाईड नोट’मुळे ते लगेचच समोर येते; पण काही घटनांमध्ये प्रकरणाचे गूढ वाढत जाते. दिल्लीतील बुराडी येथील संतनगरमधील 11 जणांच्या आत्महत्या प्रकरणाचेही हेच झाले आहे. यासंदर्भात विविध प्रकारची माहिती पुढे येत असल्यामुळे या गूढ मृत्यूंचे कोडे उलगडणे हे तपास यंत्रणांपुढे एक मोठे आव्हान असणार आहे.

कारण, एकाच कुटुंबातील 11 जणांनी आत्महत्या करणे ही देशातील सर्वांत मोठी घटना ठरण्याची शक्यता आहे. काही वर्षांपूर्वी डेहराडून येथे एकाच कुटुंबातील 10 जणांंनी आत्महत्या केली होती. पण, जगभरात अशा प्रकारच्या सामूहिक आत्महत्येच्या घटना फार कमी आढळून येतात. यासंदर्भातील एक महत्त्वपूर्ण बाब लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे समुद्रात विहार करणार्‍या व्हेल माशांमध्ये असा प्रकार पाहायला मिळतो. अतिवजन आणि प्रदीर्घ काळ पाण्यात राहून वैतागल्यामुळे बरेचसे व्हेल मासे समूहाने अथवा गटाने पाण्याबाहेर येतात आणि मृत्यू पत्करतात. व्हेल आणि मानव हे दोघेही सस्तन प्राणी आहेत, हे साम्य येथे लक्षात घेतले पाहिजे. या दोहोंमध्ये बरेच साम्य आढळून आले आहे. चिली गणराज्यसारख्या देशांमधील वैज्ञानिकांनी यावर संशोधनही केले आहे. न्यूयॉर्कमध्येही ही गोष्ट वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये सामील करण्यात आली आहे. तथापि, दिल्लीतील ही घटना आश्‍चर्याचा धक्‍का देणारी आहे. तपासाअंती समोर येणारे वास्तव काय असेल, हे येणार्‍या काळात समजेलच; पण तणावावर नियंत्रण न ठेवता आल्यास किंवा तणावाचे व्यवस्थापन करण्याची क्षमता नसल्यास तो अखेर लोकांच्या मृत्यूसही कारणीभूत ठरू शकतो, हे यातून स्पष्ट होणार आहे. 

बुराडीतील प्रकरण अंधश्रद्धा, अध्यात्मिकता आदी मुद्यांशीही जोडून पाहिले जात आहे. यानिमित्ताने एक घटना सांगावीशी वाटते. 18 नोव्हेंबर 1978 रोजी दक्षिण अमेरिकेतील गुयाना येथील जोन्स टाऊनमध्ये 918 लोकांनी सामूहिक आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. यामध्ये 276 बालकांचा समावेश होता. ते सर्व जण एका धार्मिक पंथाचे अनुयायी होते. या पंथाची स्थापना करणार्‍या जिम जोन्सनेही आत्महत्या केली होती. आधुनिक इतिहासातील सामूहिक आत्महत्येचे हे सर्वांत मोठे उदाहरण मानले जाते. या सर्वांनी सायनाईड खाऊन जीव त्यागला होता. अशाच प्रकारे 1994 ते 1997 पर्यंत ऑर्डर ऑफ द सोलर टेंपल नावाच्या धार्मिक पंथाच्या जवळपास 74 अनुयायांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. या लोकांनी लिहिलेल्या पत्रामध्ये ‘आम्ही या जगाच्या ढोंगीपणापासून आणि दडपशाहीपासून मुक्‍त होत आहोत,’ असे लिहिले होते. 

मानसशास्रीय दृष्टिकोनातून या सर्वांचा विचार करता अतिशरणता हे याचे एक कारण सांगता येईल. बरेचदा एखाद्यावर अतिप्रेम असल्यामुळेही त्याच्या विरहाच्या दुःखाचा तणाव सहन न झाल्यामुळे आत्महत्येचे पाऊल उचलले जाते. आपल्याकडे आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या निधनानंतर 100 हून अधिक जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. अशा घटनांमधील व्यक्‍तींमध्ये  आगतिक, असहाय्य वाटण्याची भावना टीपेला पोहोचते आणि त्यातून आत्महत्येचा निर्णय घेतला जातो. अलीकडील काळात आजारांमुळे खरे पाहिल्यास ही कारणे तशी अभावाने आढळणारी आहेत. सामान्यतः आढळणार्‍या कारणांमध्ये अतितणाव, नैराश्य, व्यसनाधिनता, कर्जबाजारीपणा, प्रेमभंग आणि याबरोबरीने अलीकडील काळात दिसून आलेले दुर्धर आजारपण यामुळे आत्महत्येचा विचार केला जातो. त्या-त्या घटनांची पुनरावृत्ती किंवा वारंवारिता वाढली की, त्याची चर्चा होते. उदाहरणार्थ, शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची चर्चा आपल्याकडे सर्वाधिक प्रमाणात होते. मागील काळात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांनी देश हादरला होता. काही वर्षांपूर्वी प्रेमभंगामुळे आत्महत्या करणार्‍यांची संख्या मोठी होती. भारतात दर तासाला चार लोक आजाराने त्रस्त होऊन आत्महत्या करतात, ही बाब नक्‍कीच चिंतेची आहे. भारतात 2015 या वर्षात 1 लाख 33 हजार 623 लोकांनी आत्महत्या केली आहे. कौटुंबिक समस्या आणि आजारपण या दोन्ही गोष्टी लोकांच्या आत्महत्येचे कारण ठरल्या आहेत. राष्ट्रीय गुन्हे नोंदणीच्या आकडेवारीवरून 2001 ते 2015 या वर्षांमध्ये भारतात तब्बल 18.41 लाख लोकांनी आपले जीवन संपवले होते. त्यात 3.85 लाख लोकांनी विविध आजारांनी त्रस्त होऊन आत्महत्या केली होती. 1.18 लाख लोकांनी मानसिक आजारामुळे, तर 2.37 लाख लोकांनी दीर्घकालीन आजाराला कंटाळून आत्महत्या केली आहे. 

समारोप करताना प्रश्‍न उरतो तो यावर उपाय काय? आपल्याकडे ताणतणावांचे, भावभावनांचे व्यवस्थापन कसे करायचे, याविषयीचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्थाच अस्तित्वात नाही. उदाहरणार्थ, राग आल्यास त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे, अतिदुःख झाल्यास ते कसे पचवायचे, याविषयीचे मार्गदर्शन कुठेच मिळत नाही. दुसरीकडे मानसोपचारतज्ज्ञांकडे जाणार्‍यांना समाज वेडा, हतबल ठरवतो. त्यामुळे भावनिक कोंडी होते. विशेषतः आज जेव्हा समाज आत्मकेंद्री बनत चाललेला आहे, अशा वेळी ही कोंडी अधिक तीव्र होते आणि त्या घुसमटीतून नैराश्य येऊन जीवनप्रवास संपवण्याचा विचार बळावतो. खरे तर, जीवन आनंददायी करण्याचे सामर्थ्य प्रत्येकात असते. त्यासाठी सकारात्मता अंगिकारायला हवी. कोणत्याही प्रश्‍नाला उत्तर आहे, कोणत्याही समस्येतून मार्ग निघू शकतो, हा आशावाद भिनवायला हवा. मनाचे आरोग्य टिकवण्यासाठीचे व्यायाम करायला हवेत आणि मुख्य म्हणजे विवेकबुद्धी सदोदित जागी ठेवायला हवी. तसे झाल्यास जीवन संपवण्याचा विचार मनात कधीही येणार नाही! 

- डॉ. अतुल कोकाटे, मेंदूविकारतज्ज्ञ