Thu, Apr 25, 2019 23:54होमपेज › Pune › आरटीई प्रवेशाच्या जागा वाढल्या

आरटीई प्रवेशाच्या जागा वाढल्या

Published On: Jan 31 2018 2:06AM | Last Updated: Jan 31 2018 2:03AMपुणे : प्रतिनिधी 

शिक्षण हक्‍क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकांसाठी 25 टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत (आरटीई) पालकांना 1 फेब्रुवारीपासून अर्ज भरता येणार आहेत. तसेच यावर्षी पालकांना अर्ज भरताना उत्पन्नाच्या दाखल्याचा नंबर देणे आवश्यक आहे. हा दाखला महाऑनलाइनवरून आधार लिंक करण्यात येणार आहे. त्यामुळे बोगस आरटीई प्रवेशाला आळा बसणार असून अर्ज भरण्यास नगर जिल्ह्यापासून सुरुवात करणार असल्याची माहिती प्राथमिकचे उपसंचालक शरद गोसावी यांनी दिली आहे. दरम्यान यंदा आरटीई प्रवेशाच्या जागा वाढल्या असून 16 हजार 294 जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत.

गेल्या वर्षी शहरातील 849 शाळांनी आरटीई प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेतला होता. त्यामुळे आरटीई प्रवेशाच्या तब्बल 15 हजार 693 जागा उपलब्ध झाल्या होत्या. परंतु यंदा तब्बल 943 शाळांनी नोंदणी केली असल्यामुळे प्रवेशाच्या संख्येत वाढ होऊन 16 हजार 294 जागा उपलब्ध झाल्या आहेत.

आरटीई प्रवेशासंदर्भात माहिती देताना गोसावी म्हणाले, आरटीई प्रवेश प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी उत्पन्नाचा दाखला आधार लिंक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यातील शाळांची नोंदणी शंभर टक्के पूर्ण झाली आहे अशा नगर जिल्ह्यात 1 फेब्रुवारीपासून पालकांना अर्ज भरण्यास सांगण्यात येणार आहे. अगोदर उत्पन्नाचा दाखला आहे किंवा नाही एवढेच विचारण्यात येत होते. आता मात्र पालकांना उत्पन्नाच्या दाखल्याचा क्रमांक अर्ज भरताना द्यावा लागणार आहे. हा दाखला आधार लिंक करण्यात येणार असल्यामुळे त्याची सत्यता पडताळता येणार आहे. त्यामुळे बोगस उत्पन्नाचे दाखले काढून प्रवेश घेणार्‍यांना आळा बसणार आहे. याची सुरुवात प्रायोगिक तत्वावर नगर जिल्ह्यातून करून तांत्रिक बाबींची तपासणी करून मग राज्यातील उर्वरित जिल्ह्यात पालकांना अर्ज भरण्याची संधी दिली जाणार आहे.

 दरम्यान यंदा आरटीई प्रवेशासाठी राज्यात तब्बल 9 हजार 101 शाळा उपलब्ध असून प्रवेशासाठी 1 लाख 21 हजार 304 जागा उपलब्ध झाल्या आहेत.

मुदतवाढ आवश्यक

दरम्यान, आरटीई प्रवेशासाठी उत्पन्नाचा दाखला अनिवार्य केल्याने, त्यासाठी पालकांना वेळ द्यावा लागणार आहे. तसेच प्रायोगिक तत्त्वावर दाखला आधार लिंक करताना येणार्‍या अडचणींचा विचार करता आरटीई प्रवेशाचे अर्ज भरताना मुदतवाढ द्यावी लागणार आहे. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक कोलमडणार असून पालकांची आणि अधिकार्‍यांची डोकेदुखी वाढणार आहे. परंतु यामुळे प्रक्रिया पारदर्शक होण्यास मदत होणार असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.