Fri, Apr 26, 2019 09:40होमपेज › Pune › मुलांमध्ये हृदयविकाराचा वाढता आलेख

मुलांमध्ये हृदयविकाराचा वाढता आलेख

Published On: Apr 28 2018 1:45AM | Last Updated: Apr 28 2018 1:21AMपुणे : प्रतिनिधी

जिल्ह्यामध्ये प्रत्येक वर्षात शून्य ते अठरा वयोगटातील मुलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या 73 पथकांकडून जिल्ह्यातील शून्य ते 18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येते. या तपासणीमध्ये 2016-17 मध्ये 285 तर 2017-18 मध्ये 313 मुलांना हृदयरोगाचे निदान झाले. गेल्या पाच वषार्र्ंमध्ये हा आलेख वाढता आहे.

सन 2013 ते 2018 या पाच वर्षांच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाडी आणि अनुदानित शाळांमधील तब्बल 1 हजार 71 मुले हृदयविकाराने ग्रस्त असल्याचे आढळून आले. त्यापैकी 789 मुलांवर राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद आणि जिल्हा शल्य चिकिस्तक यांच्या वतीने हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली. राष्ट्रीय आरोग्य अभियानाने जिल्ह्यात 73 पथके नेमली आहे. या एका पथकात एक पुरुष डॉक्टर, एक महिला डॉक्टर, एक नर्स आणि औषध वाटप करणार्‍या कर्मचार्‍यांचा समावेश आहे. दर सहा महिन्याने  ही तपासणी केली जाते. जिल्हा परिषद, जिल्हा चिकित्सक आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान या तीन विभागांच्या मदतीने हृदयविकार असलेल्या 789 मुलांवर राजीव गांधी जीवनदायी योजना तसेच इतर माध्यतून शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच उर्वरित मुलांपैकी 46 मुलांच्या पालकांची शस्त्रक्रिया करून घेण्याची तयारी नाही, तर 54 मुलांच्या प्रकृतीची माहिती घेतली जात आहे. तसेच 57 मुलांना शस्त्रक्रियेची गरज नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 
हृदयविकार असलेल्या 49 मुलांवर औषधोपचार सुरू आहेत. तर, 30 मुलांचा आजार गुंतागुंतीचा असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया होऊ शकत नाही. 8 विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करणे अवघड आहे. दहा विद्यार्थ्यांवर लवकरच शस्त्रक्रिया होणार आहे. सात मुलांना अत्याधुनिक तपासण्यांची गरज आहे.
डॉ. दिलीप माने, आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद