Tue, Mar 19, 2019 11:50होमपेज › Pune › वैद्यकिय उपकरणांचा घरगुती वापर वाढला

वैद्यकिय उपकरणांचा घरगुती वापर वाढला

Published On: Jul 02 2018 1:47AM | Last Updated: Jul 01 2018 10:29PMपुणे : प्रतिनिधी

पुर्वी रुग्णांची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांकडून वापरली जाणारी मुलभूत उपकरणे आता घरच्या घरी नागरिकांकडून वापरली जात आहेत. तसेच जुनी पारा असलेले (मर्क्यूरी) उपकरणाऐवजी अत्याधुनिक डिजिटल आणि हातळण्यास सोपी असलेले उपकरणे वापरण्याकडे नागरिकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. पुर्वींच्या उपकरणांपेक्षा आकाराने लहान, वजनाने हलकी, हाताळण्यास सोपी, अद्ययावत आणि एका जागेवरून दुसरीकडे घेउन जाण्यासाठीची सहजसुलभता यामुळे ही नवीन उपकरणांना नागरिकांकडून अधिक पसंती मिळत आहे. ही उपकरणे वापरण्यास सुरक्षित आणि अचुक असून फक्‍त चांगल्या कंपन्यांची उपकरणे वापरणे गरजेचे असल्याचे वैद्यकिय तज्ज्ञ सांगतात. 

थंडी, ताप, सर्दी, खोकला असे किरकोळ संसर्गजन्य (व्हायरल इन्फेक्शन्स) आजार प्रत्येकाला होत राहतात. यावेळी ताप पाहण्यासाठी ही घरच्या घरी ताप मोजण्यासाठी डिजिटल थर्मामीटर वापरले जात आहे. तसेच प्रसंगी बीपी मॉनिटरद्वारे रक्‍तदाब, पल्स मॉनिटर/ ऑक्सिमीटरने ह्रदयाचे,  नाडीचे ठोके आणि शरीरातील ऑक्सिजन तपासला जातो. तसेच नेब्युलायझरने वाफ घेतली जाते. कोणत्याही रुग्णाला तपासण्यासाठी व प्राथमिक उपचारासाठी ही मुलभूत वैद्यकिय उपकरणे आवशक आहेत. तीच दिवसेंदिवस अद्ययावत होत आहेत आणि त्याचा वापरही रुग्णांकडून वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे प्राथमिक निदान घरीच करून त्यानुसार उपचार घेण्यात नागरिक पसंती देत असल्याचे दिसून येते. 

ताप मोजण्यासाठी सध्याचे थर्मामीटर हे लहान व डिजिटल डिस्प्ले असलेले आहेत. त्याचप्रमाणे रक्‍तदाब तपासण्यासाठीही नवीन तळहाताएव्हढी स्वयंचलित हवा भरली जाणारी बीपी मॉनिटर मशीन वापरली जात आहेत. पण जुनी हाताने हवा भरता येणारी मर्क्यूरीची देखील ही उपकरणे ब-याच ठिकाणी वापरली जात आहेत. नाडीचे ठोके आणि रक्‍तातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्यासाठी डिजिटल ‘पल्स ऑक्सीमीटर’ वापरला जात आहे.  तर वजन करण्यासाठी पूर्वीची किलोमध्ये मोजणारी वजनकाटेही हददपार झाले असून आता ग्रॅम मध्ये वजन मोजणारी  डिजिटल वजनकाटे वापरले जात आहेत. हे सर्व बदल गेल्या दहा वर्षांमध्ये झपाटयाने झाल्याचे विविध जनरल प्रॅक्टिशनर्सचे मत आहे. या उपकरणांद्वारे निदान करण्यासाठी गती मिळत आहे. तर जुन्या उपकरणांपेक्षा नवीन उपकरणांचे निदानाची अचुकता थोडी चुकत असली तरी त्यामुळे वैद्यकिय निदानात फार काही फरक पडत नाही, डॉक्टरांचे मत आहे.